सव्यसाची

0

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून महाराष्ट्रात एक वैचारिक घुसळण सुरू झाली होती. लोकहितवादी, महात्मा फुले यांच्यापासून ते न्या. गोविंद महादेव रानडे, लोकमान्य टिळक, आगरकर, नामदार गोखले अशा दिग्गजांनी ही वैचारिक परंपरा समृद्ध केली आणि त्याचबरोबर सामाजिक बदलांना दिशाही दिली. आधुनिक जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन या वैचारिक परंपरेतून निर्माण होत गेला. हीच परंपरा जपणारे आणि ती पुढे नेणारे सव्यसाची संपादक म्हणून गोविंदराव तळवलकर कायमच स्मरणात राहतील. जगभरचे साहित्य, संस्कृतीबरोबरच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारणाचा व्यासंग असणारे संपादक- लेखक म्हणून गोविंदराव तळवलकरांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्यात कायमस्वरूपी आपला ठसा उमटवला आहे.

महाराष्ट्राच्या या वैचारिक परंपरेचेही स्थूलमानाने दोन भाग पडतात. लोकमान्य टिळकांसारख्यांचा रोखठोक राष्ट्रवाद, तर आगरकर, गोखले प्रभुतींचा बुद्धिप्रामाण्यवाद, मानवतावाद. लोकमान्य टिळक आणि एम. एन. रॉय ही वास्तविक दोन वेगळ्या विचारधारांची व्यक्तिमत्त्वे. या दोघांंच्या लेखनाचा गोविंदरावांवर प्रभाव होता. त्याच वेळी समर्थ रामदासांसारख्या संतांच्या लेखणीचेही ते भोक्ते होते. गोविंदरावांचे वैशिष्ट्य असे, की या वैचारिक परंपरांचा दांडगा व्यासंग असूनही ते अशा कोणत्याच विचारधारेत गुरफटले नाहीत की त्यांनी कोणाचे अनुकरण केले नाही. उदारमतवादी असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. ज्ञानार्जनासाठी त्यांनी आय्ुष्यभर आपल्या मनाची कवाडे खुली ठेवली होती म्हणूनच अखेरपर्यंत ते व्यासंगात बुडालेले होते. त्यामुळेच सर्व लेखनातून त्यांचा व्यासंग सातत्याने जाणवत राहिला. अत्यंत अवघड विषयही सोप्या भाषेत सांगण्याची त्यांची हातोटी वाचकप्रिय ठरली. चपखल शब्दांचा वापर हे त्यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ट्य. त्यांच्या अग्रलेखांचे मथळे जरी डोळ्याखालून घातले, तरी याची साक्ष पटेल.

लोकसत्ताचे पहिले संपादक ह. रा. महाजनी यांनी गोविंदरावांना उपसंपादक म्हणून प्रथम संधी दिली. तेव्हा लोकसत्ता साप्ताहिक स्वरूपात प्रसिद्ध होत असे. लोकसत्तात रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी महाजनी यांनी गोविंदरावांना संपादकीय लिहिण्याची संधी दिली आणि गोविंदरावांनी तिचे चीज केले. पत्रकारितेत दाखल झाल्यानंतर अवतीभवतीच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घटकांचे सूक्ष्म अवलोकन करून, त्यातील गुण-दोष ते तेवढ्याच रोखठोक भाषेत मांडत असत. त्यांच्या या रोखठोकपणातही शालीनता, सुसंस्कृतता होती. भाषेचा डौल होता. या व्यासंगातूनच समाजमनावर आणि तत्कालीन धुरिणांवर संपादक म्हणून त्यांचा नैतिक धाक होता.

स्वातंत्र्यानंतरच्या नेहरू युगापासून ते आजच्या मोदी युगापर्यंतचे ते साक्षीदार होते आणि आपल्या व्यासंगातून त्यांनी या युगातील घटनांचे केलेले विश्‍लेषण पुढील पिढ्यांना मार्गदर्शकच ठरणार आहे. न्या. रानडे, नामदार गोखले हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते आणि अशा समाजधुरिणांच्या कार्याची त्यांनी पुढील पिढ्यांना करून दिलेली ओळखही फार महत्त्वाची आहे. 1950 चे दशक हे शीतयुद्धाच्या प्रारंभाचे दशक होते. त्यावेळी साम्यवादी विचारसरणी जोरात होती आणि आपण असे कम्युनिस्ट असणे हे पुढारलेपणाचे लक्षण मानले जात होते. त्या काळात गोविंदरावांनी आपल्या अभ्यासपूर्ण लिखाणातून हा भ्रमाचा भोपळा फोडण्याचे काम केले. तत्कालीन साम्यवादी राजवटींत होणारी मुस्कटदाबी व एकूणच सामाजिक हानीचे दर्शन त्यांनी आपल्या वाचकांना घडवले. आर्थर कोस्लर, जॉर्ज ऑरवेल, कार्ल पॉपेर, कोलाकोवस्की, अशा जागतिक कीर्तिच्या लेखकांच्या मानवतावादी दृष्टिकोनाचा गोविंदरावांवर असलेला प्रभाव त्यातून दिसून आला. सोव्हिएत महासंघाच्या अस्तानंतर गोविंदरावांनी पूर्व युरोपीय देशांचाही दौरा केला होता. त्यातून त्यांनी साम्यवादी राजवटींचा का पाडाव झाला, याचे सूक्ष्म अवलोकन केले. बदलता युरोप तसेच, सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त ही त्यांची पुस्तके म्हणूनच ऐतिहासिक दस्तऐवज ठरणारी आहेत. इराक, अफगाणिस्तानातील युद्धांवरही त्यांनी केलेले लेखन असेच माहितीपूर्ण दस्तऐवज ठरले आहेत. मराठीवर नितांत प्रेम करणार्‍या गोविंदरावांनी इंग्रजीतूनही विपुल लेखन केले आहे. अनेक इंग्रजी नियतकालिके व वृत्तपत्रांमधूनही ते नियमितपणे स्तंभलेखन करत होते. निवृत्तीनंतरही त्यांचा हा व्यासंग कायम होता.

गोविंदराव शेवटपर्यंत ग्रंथांमध्ये रमले, पण म्हणून ते माणूसघाणे नव्हते. मराठी संपादक म्हणून ते केवळ मराठीजनांत रमले असेही नव्हते. थोर नेते यशवंतराव चव्हाणांपासून ते मिनू मसानी, रतन टाटा, नानी पालखीवाला अशा राजकारण, साहित्य, उद्योग, अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी त्यांचा शेवटपर्यंत स्नेह राहिला. 1980 मध्ये शरद पवार यांनी राज्यात पुलोदचे सरकार स्थापन केले. त्याचेही ते एकमेव साक्षीदार होते. पुढे 25 वर्षांनी त्यांनी या सरकार स्थापनेमागच्या घडामोडी उजेडात आणल्या असता, त्यांच्यावर टीकाही झाली. पण त्यामुळे ते डगमगून गेले नाहीत. मराठी वृत्तपत्रात क्रीडा व अर्थ या विषयांना तुलनेने फार कमी स्थान मिळत असे. गोविंदरावांनी मराठी पत्रकारितेतील ही दालने समृद्ध केली. डॉ. टिकेकरांसारख्या विचारवंताला गोविंदरावांनीच पत्रकारितेत आणले तसेच पत्रकारांच्या काही पिढ्याही त्यांनी घडवल्या. अशा या ज्ञान गुण संपन्न संपादकाला जनशक्ति परिवारातर्फे आदरांजली.