सव्यसाची पत्रकार आणि संशोधक साहित्यिक

0

महानगरी मुंबईतल्या राजकीय पटलावरच्या विदारक वास्तवाचे हुबेहूब शब्दचित्र असलेल्या, ’मुंबई दिनांक’ आणि ’सिंहासन’ या दोन साहित्यकृतींमुळे ज्यांचे नाव आजच्या काळातही चर्चिले जाते, ते अरुण साधू हे 25 सप्टेंबर 2017च्या पहाटेस आपल्या वयाच्या शहात्तराव्या वर्षी कालवश झाले. ते मूळचे अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा या गावचे. अमरावतीच्या कॉलेजमधून बी.एस्सी. झाल्यावर ते एमएस्सीसाठी पुण्यात दाखल झाले. परंतु, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी पत्रकारितेचा मार्ग चोखाळला. पुढील काळात त्यांनी पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात अध्यापनदेखील केले. ते हाडाचे पत्रकार होते. त्यांनी ’फ्री प्रेस जर्नल’चे मुख्य संपादक म्हणून जसे काम केले तसे इतरही अनेक इंग्रजी दैनिकांमधून भरपूर स्तंभलेखन केले. मुक्त पत्रकारिता करण्यात त्यांना अधिक रुची होती. त्यांचा पिंड शोधपत्रकारितेचा आणि गंभीर लेखनाचा होता, तरीही त्यांच्या लेखनात सर्वसामान्य वाचकांच्या मनाची पकड घेण्याची ताकद होती. त्यांचा लेखन-प्रपंच अवाढव्य होता. पडघम, स्फोट, बहिष्कृत, तिसरी क्रांती, मुखवटा, मंत्रजागर, त्रिशंकू ही त्यांच्या पुस्तकांची शीर्षकेच बरेच काही सांगून जातात. क्यूबाचे फिडेल कॅस्ट्रो आणि चे गवारा या दोन क्रांतिकारक लढवय्या मुत्सद्द्यांबद्दलचे त्यांचे पुस्तक असो की माननीय यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलचे असो, काकासाहेब गाडगीळ यांच्याबद्दलचे असो अथवा’ ड्रॅगन जेव्हा जागा होतो’ हे चीनसंबंधीचे पुस्तक असो, त्यात अरुण साधू यांची अभ्यासू आणि शोधक वृत्ती ठायी ठायी दिसून येते. सिंहासन या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे मूळ कथानक, सुरुवातीला उल्लेखलेल्या त्यांच्याच दोन साहित्यकृतींवरून घेतले गेले होते. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावरील, डॉ. जब्बार पटेल निर्मित लघुपटासाठी अरुण साधू यांनीच संहिता लिहिली होती. राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरील जयसिंहराव पवार लिखित मराठी ग्रंथाचा उत्तम इंग्रजी अनुवाद अरुण साधू यांनीच केलेला आहे. अरुण साधू हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक होते. अमेरिकेतल्या मराठी मंडळींनी’ जीवनगौरव पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित केले होते. पत्रकारितेच्या क्षेत्रात बहुमानाचे समजले जात असलेले, भैरूरतन दमाणी पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार आणि आचार्य अत्रे पुरस्कार त्यांना देण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असा’ जनस्थान – पुरस्कार’ दिला होता. नागपूरला 2007 साली झालेल्या 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

पुढील वर्षी सांगली येथील साहित्य संमेलनात मावळते अध्यक्ष या नात्याने ते नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. म.द. हातकणंगलेकर यांच्या हाती समारंभपूर्वक सूत्रे सोपवण्यासाठी जातीने उपस्थित झाले होते. परंतु, त्या संमेलनाचे उद्घाटन महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संपन्न होत असल्याने त्यावेळी व्यासपीठावर साहित्यबाह्य क्षेत्रातल्या मंडळींनी इतकी गर्दी केली होती की, त्यामुळे मावळते साहित्य संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांना आणि काही निमंत्रित माजी संमेलनाध्यक्षांना व्यासपीठापर्यंत पोहोचून आसन ग्रहण करणेदेखील दुरापास्त होऊन बसले होते. मान्यवर आणि बुजूर्ग साहित्यिकांचा कसलाही मुलाहिजा न ठेवता अनेक राजकारणी मंडळींनी आपापले राजकीय वजन वापरून व्यासपीठावर वर्णी लावली होती.

तो सर्व प्रकार पाहिल्यावर अरुण साधू अत्यंत क्षुब्ध झाले. मात्र, झाल्या प्रकाराचा आपल्या भाषणात उत्स्फूर्तपणे जाहीर निषेध व्यक्त केला जाऊन संमेलनाच्या शुभारंभास गालबोट लागू नये, यासाठी ते तिथून जे निघून गेले ते संमेलनात पुन्हा परतलेच नाहीत! त्या घटनेचा मी स्वतः प्रत्यक्षदर्शी होतो! असे हे स्वाभिमानी आणि तरीही संयत स्वभावाचे सव्यसाची पत्रकार, लेखक अरुण साधू! त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन!

– प्रवीण कारखानीस
9860649127