शिरपूर। शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून शहरातील एका घरावर कार्यवाही करीत दोन तोंडी मांडूळ जातींचे ६ साप ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कार्यवाही २७ एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली. या कार्यवाहीत जप्त करण्यात आलेल्या एक मांडुळची अंदाजित किंमत २० लाखापर्यंत आहे.यामागे शिरपूर शहरात आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर असे की, शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना एका गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून शिरपूर शहरातील ईदगाह नगर भागातील शाबीर शेख यांच्या घरावर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धाड टाकण्यात आली. या कारवाईत शाबीर शेख यांच्या घराच्या छतावर सहा ते सात फुटाच्या एका लाकडी खोक्यात अतिदुर्मिळ मांडूळ जातीचे साप तस्करी करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळून आले. या दुर्मिळ सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. या दुर्मिळ मांडूळ जातीच्या एका सापाची किंमत अंदाजे २० लाख रुपये आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पीएसआय संदिप मुरकुटे, पोना अनिल शिरसाठ, पोलीस शिपाई संदीप रोकडे, महिला पोलीस अनुराधा धाकड,आदीनी केली.
याप्रकरणी संशयित शबीर शेख (वय ४१) याला ताब्यात घेण्यात आले असून सर्प मिंत्रांच्या साहाय्याने अंदाजित १ कोटी २० लाख रुपये किमतीचे ६ दुर्मिळ मांडूळ जातीचे साप ताब्यात घेण्यात आले आहेत. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत वनविभागाला सुचित करण्यात आले आहे.