सव्वा दोन लाखांची फसवणूक

0
कर्जाच्या आमिषाने दापोडीतील एकाने घातला गंडा
भोसरी : पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यासाठी खासगी एजंटने प्रोसेसिंग फी म्हणून 2 लाख 20 हजार रुपये घेतले. मात्र कर्ज मंजूर केले नाही. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते 30 ऑगस्ट 2018 दरम्यान पुण्यातील केसरीवाडा आणि दापोडी येथे घडला. रेवराज देवनाथ तिघरे (वय 42, रा. मातोश्री क्लासिक बिल्डिंग, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अब्दुल सय्यद (रा. दापोडी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम क्षेत्रासाठी हवे होते कर्ज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवराज एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना रियल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी कर्ज हवे होते. आरोपी अब्दुल खाजगी कर्ज मंजूर करून देण्याचे काम करतो. अब्दुल याने रेवराज यांना पाच कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी त्याने रेवराज यांच्याकडून प्रेसेसिंग फी म्हणून 2 लाख रुपये आणि वकिलांची फी 20 हजार रुपये असे एकूण 2 लाख 20 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन देखील कर्ज मंजूर करून दिले नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रेवराज यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. फसवणुकीचा प्रकार पुणे पोलीस आयुक्तालयातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने भोसरी पोलिसांनी हा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे तपास करीत आहेत.