सव्वा लाखांची बनावट दारू जप्त

0

जळगाव । शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास भोईटेनगरातून बनावट देशी दारू वाहतुक करणारे वाहन पकडले. त्यात पोलिसांना सव्वा लाख रुपये किंमतीच्या बनावट देशी दारूचे पन्नास बॉक्स मिळून आले. पथकाने बनावट दारूसह वाहनचालकास ताब्यात घेतले असून चालकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चालकाचा साथीदार हा पोलिसांना पाहून घटनास्थळावरून फरार झाला आहे. यातच धुळ्याकडून भुसावळडे चालक बनावट दारू घेवून जात होता. वाटेतच पोलिसांना त्यास पकडून कारवाई केली आहे. यासोबतच पोलिस साथीदाराच्या शोधार्थ आहे.

या पथकाने केली कारवाई
मालवाहतुक वाहन क्रं. एमएच.28.एच.9650 मधून बनावट देशी दारू धुळ्याकडून भुसावळकडे घेवून जात असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकुर यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पोनि. ठाकुर यांनी डिबी कर्मचारी अकरम शेख, इम्रान सैय्यद, संजय हिवरकर, संजय भालेराव, गणेश शिरसाळे, मोहसिन बिरासदार, सुधीर साळवे, दिपक सोनवणे आदींना बनावट दारू पकडण्यासाठी पाठविले. डिबी पथकाने महामार्गावर सापळा रचला मात्र, बनावट दारू वाहून नेत असलेल्या चालकाने शहराकडे वाहन वळविले. यानंतर भोईटेनगरातून बनावट दारूचे वाहन जात असल्याची माहिती मिळताच पथकाने भोईटेनगर गाठत वाहनास पकडले. यानंतर चालकाची विचारपूस केल्यानंतर त्याने सागर चंदूलाल अग्रवाल (रा.धुळे) असे नाव सांगितले. या दरम्यान, पोलिसांना पाहून चालकाचा दुसरा साथीदार तेथून पसार झाला.

कॅरेटस् मागे लपविली दारु
शहर पोलिसांच्या पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात 1 लाख 25 हजार रुपयांच्या बनावट देशी दारूचे 50 बॉक्स मिळून आले. पोलिसांनी चालक सागर अग्रवाल यांच्यासह वाहन व बनावट दारू ताब्यात घेत पोलिस ठाण्यात जमा केले. दरम्यान, दारू कुणाला दिसून नये यासाठी चालकाने शक्कल लढवत मालवाहतूक गाडीच्या मागील बाजूस आत पहिले दारूचे बॉक्स ठेवलीत त्यानंतर दारू दिसू नये यासाठी त्याच्यासमोर खाली कॅरेट्स ठेवले होते. मात्र, जळगाव पोलिसांसमोर चालकाची हुशारी उघडी पडली. चालक सागर अग्रवाल याला अटक करण्यात येवून त्याच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, स्वत:च दारू बनवत असल्याची माहिती पोलिसांना त्याने दिली आहे.