नागपूर । महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ललाटरेषा बदलण्याची क्षमता असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकर्यांच्या जमिनींच्या थेट खरेदीला गुरुवारी नागपूरजवळच्या हिंगणा येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या ऐतिहासिक प्रसंगी पहिल्या काही खरेदी खतांवर साक्षीदार म्हणून शिंदे आणि एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी स्वाक्षर्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पातील ऐतिहासिक टप्पा या जमीन खरेदीने गाठला गेला असून प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. याप्रसंगी 120 शेतकर्यांनी आपल्या जमिनी देण्यासाठी इरादापत्रेही दिली.
शेतकर्यांशी संवाद
शिंदे यांनी यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला. शेतकर्यांच्या समृद्धीसाठीच हा प्रकल्प असून एकाही शेतकर्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असेही आश्वासन शिंदे यांनी दिले.
1 हिंगणा येथील तहसिलदार कार्यालयात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. हा प्रकल्प व्हावा, यासाठी उत्सुक असलेल्या शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
2 या प्रकल्पासाठी जमीन देणारे पहिले शेतकरी म्हणून राम साहू यांचे नाव इतिहासात कोरले गेले असून त्यांच्या अंदाजे सव्वा हेक्टर जमिनीची शासनाने 59 लाख 11 हजार रुपयांना खरेदी केली.
3 पहिल्या काही खरेदी खतांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा. उ.) एकनाथ शिंदे आणि एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुरुंदकर यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षर्या करून या ऐतिहासिक सोहळ्यात आपलाही सहभाग नोंदवला.
शिवसेना विकासाच्या बाजून
शिवसेना नेहमीच विकासाच्या बाजूने उभी राहाते. किंबहुना, मुंबई-पुणे दृतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्स्प्रेस वे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच स्वप्नातून साकारला होता. मात्र, प्रकल्प साकारत असताना एकाही शेतकर्यावर अन्याय होता कामा नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. प्रत्येक शेतकर्याशी चर्चा करून, अखेरच्या शेतकर्याचे समाधान करूनच हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची राज्य शासनाचीही भूमिका आहे,
शासनाने या प्रकल्पासाठी जमिनीला आजवरचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले असून रेडी रेकनर अथवा बाजारभाव यापेक्षा जे जास्त असेल, त्याच्या पाच पट रक्कम मोबदला म्हणून मिळणार आहे.