ससाणेनगर रेल्वे पुलाचे काम मार्गी लावावे

0

हडपसर । ससाणेनगर रेल्वे फाटक पुलाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या रस्त्यावर वारंवार वाहतूककोंडी होत असल्याने सय्यदनगर, ससाणेनगर, हडपसर परिसरातील नागरिक वाहतूककोंडीने हैराण झाले आहेत. या रस्त्याचे काम लवकर मार्गी लावण्यात यावे, यासाठी ससाणेनगर येथील स्थानिक महिलांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन पुलाचे काम सुरू करण्यात यावे यासाठी निवेदन दिले.

ससाणेनगर, सय्यदनगर येथील अंडर ग्राउंड किंवा उड्डाणपूल काहीही बनवा परंतु या रस्त्यावरील पुलाचे काम लवकर मार्गी लावा असे येथील महिलांनी सांगितले. या रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत असून त्याचा त्रास अनेकांना होत आहे. वाहतूककोंडी झाली की त्यामध्ये वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिका प्रशासनाने अधिक वेळ न घालविता येथे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल करावा; परंतु पहिले काम सुरू करण्याचा आग्रह महापालिका आयुक्ततांकडे धरला. निवेदन देणार्‍यात तनिष्काच्या व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता गायकवाड, अनिता हिंगणे, दीपाली कवडे, मंगला तोडकर, लता देशमुख, रोहिणी आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी या पुलाचे बजेट खूप मोठे आहे, काही तांत्रिकभूसंपादनाच्या बाबी असून या विषयावर बैठक बोलवणार आहे, सर्वांशी चर्चा करून लवकरच रेल्वे फाटक पुलाचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले असल्याचे स्मिता गायकवाड यांनी सांगितले.