ससूनकडे अत्याधुनिक रक्त संकलन व्हॅन

0

पुणे । ससून रुग्णालयाची रक्तपेढी आता अधिक सुसज्ज झाली आहे. रुग्णालयाच्या ताफ्यात आता अत्याधुनिक मोबाईल ब्लड कलेक्शन व्हॅन दाखल झाली आहे. रोटरी क्लब ऑफ पुनाच्या वतीने डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरीयन अभय गाडगीळ यांनी ही व्हॅन रुग्णालयाला सुपुर्द केली आहे. या अत्याधुनिक ब्लड व्हॅनचा वापर पुणे, पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील रक्तदान शिबिरासाठी करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले म्हणाले, या व्हॅनमुळे रुग्णालयाची रक्त संकलनाची क्षमता वाढली असून यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. ही व्हॅन मिळाल्यानंतर ससून रक्तपेढीने 2018 या चालू वर्षात 24 हजार युनिट रक्त संकलन करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यापूर्वी (2017 मध्ये) ससून रक्तपेढीने 187 रक्तदान शिबिरे घेतली. त्याद्वारे त्यांनी 14 हजार 502 युनिट रक्त संकलन केल्याची माहिती त्यांनी दिली.

अत्याधुनिक मोबाईल ब्लड कलेक्शन व्हॅनची वैशिष्टे
व्हॅन वातानुकुलित फिरते रक्त संकलन वाहन असून यात रक्तदात्याचे रक्त संकलन करण्याची संपूर्ण सोय आहे. या व्हॅनद्वारे एकाच वेळी दोन रक्तदाते रक्तदान करू शकतात. रक्त साठवण्यासाठी दोन ब्लड बँक रेफ्रिजरेटर, रक्ताच्या 200 पिशव्या साठविण्याची आणि शितसाखळी मेंटन करण्याची सुविधा आहे. शितसाखळी कार्यान्वित राहण्यासाठी 10 तासांच्या बॅटरी बॅकअपची सुविधा यासारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत.