ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांची बदली

0

पुणे- ससून रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलून त्याला लोकाभिमुख करणारे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांची बदली झाली आहे. त्यांची बदली मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. डॉ. चंदनवाले हे जवळपास साडेसहा वर्षांपासून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी कार्यरत होते. त्यांनी ससून रुग्णालयाला सीएसआर फंडच्या माध्यमातून करोडो रुपयांच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.

रुग्णालयातील डॉक्टर, विद्यार्थी, कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय साधून योग्य नियोजन केले. सामान्य लोकांना चांगल्या सुविधा मोफत मिळाव्या यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. ससूनची आधुनिकीकरण करतांना शासकीय निधीवर अवलंबून न राहता त्यांनी उद्योग, सामाजिक संस्था, देवस्थान यांच्याकडून ‘सीएसआर’च्या माध्यमातून करोडो रुपयांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये दगडूशेठ हलवाई देवस्थानानेही मोठा निधी दिला.

डॉ. चंदनवाले यांच्या प्रयत्नातून गरीब रुग्णांसाठी किडनी ट्रान्सप्लांट, लिवर ट्रान्सप्लांट तसेच अनेक गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया करण्याच्या सुविधा सुरू केल्या. हृदय ट्रान्सप्लांटसाठी त्यांनी परवानगी मागितली आहे. त्याचबरोबर स्वायत्तेसाठी त्यांनी प्रयत्न केले. आता डॉ. चंदनवाले यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे.