ससून रुग्णालयातील ‘मातृदुग्ध’ पेढी नवजात बालकांसाठी फायदेशीर!

0

पुणे । ससून रुग्णालयाने सरकारी रुग्णालयात मातृदुग्ध पेढी सुरू केली आहे. यामुळे दूध संकलन करण्याची नवी व्यवस्था निर्माण झाली आहे. त्याचा फायदा नवजात अर्भकांना होत आहे. ससून रुग्णालयाने नव्याने सुरू केलेल्या या प्रकल्पाचा फायदा आजपर्यंत 10 हजार बालकांना झाला आहे. यामुळे ससून रुग्णालयाने सुरू केलेला हा प्रयोग नवजात बालकांसाठी वरदानच ठरत आहे.नवजात बालकाला पहिले 6 महिने नैसर्गिक दूध मिळणे गरजेचे आहे. आईच्या दुधापासून वंचीत राहणार्‍या नवजात बालकांसाठी मातृदुग्ध पेढीची संकल्पना पुढे येऊन ससून रुग्णालयाने याविषयी पाऊल उचलले. यानुसार चार वर्षांपुर्वी 2013 साली रुग्णालयात ‘ह्युमन मिल्क बँक’ सुरू करण्यात आली. पुढे 2016 साली ‘ह्युमन मिल्क व्हॅन’ सुरू करण्यात आली. या व्हॅनच्या माध्यमातून कमला नेहरू हॉस्पिटल व सोनवणे हॉस्पिटल येथील मातांकडून दूध जमा केले जाऊ लागले.

दूधाचे संकलन
मिल्क बँक व फिरती मिल्क व्हॅनच्या माध्यमातून दूध संकलीत करून ते नवजात बाळांसाठी वापरले जाते. मातेच्या दुधामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते तसेच बाळास नेक्रोटाईझिंग एन्टेरो कोलायटीस या आजारापासून प्रतिबंध होतो. यामुळे नवजात बालकांसाठी ही योजना आधार ठरली असून यासाठी गेल्या चार वर्षांत 17 हजार मातांकडून दूध संकलित करण्यात आले आहे. रुग्णालयात दरमहा 200 बालकांना मातृदुग्धपेढीचा लाभ झाला असून प्रतिवर्षी अडीच हजार बालकांना जीवनदान मिळाले आहे.

दुग्धदानाचे आवाहन
प्रसुती झालेल्या मातांना समुपदेशनाद्वारे स्वेच्छेने दुग्धदानाचे आवाहन करण्यात येते. नवजात बालकांना मातेचे नेसर्गिक दुध मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर समाजातील अनाथ बालकांना नैसर्गीक दूध मिळण्यास अडचण येत असल्यास त्यांना देखील रुग्णालयातर्फे मदत करण्यास ससून सदैव कार्यरत आहेत.
– डॉ.अजय चंदनवाले,
अधिष्ठाता, ससून रूग्णालय