पुणे । ससूनच्या सिम्युलेशन विभागासाठी खासदार निधीतून 2.25 कोटी निधी उपलब्ब्ध करून देतानाच ससून कायम स्वरूपी स्वच्छ ठेवाण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागणार आहे. ह्या यंत्रणेसाठीआवश्यक तो निधी जनता, लोकप्रतिनिधी आणि सरकार ह्याच्या मदतीने उभी करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले.
ससून अभ्यागत मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर बोलताना मंडळाचे अध्यक्ष खा. शिरोळे यांनी ही माहिती दिली. आमदार जगदीश मुळीक, आमदार विजय काळे, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, अभ्यागत मंडळाचे संभाजी पाटील, बागेश्री मंथाळकर आदी सदस्य आणि ससूनमधील संबंधित अधिकारी उपस्थित होते. ससूनमधील निवासी वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्च करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक सर्वंकष अहवाल तयार करून बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी विस्तृत चर्चा करणार असल्याचे देखील शिरोळे यांनी सांगितले.
ससून रुग्णालयात येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचारी वॉर्डमध्ये, भिंतींवर, आवारात थुंकत असल्याने रुग्णालयाचा परिसर अस्वच्छ राहतो. त्याची स्वच्छता करणेही अशक्य होते. याचा विचार करून ससून स्वच्छ राहण्यासाठी आवारात किंवा आत कोणीही थुंकताना आढळला तर त्याच्याकडून दुप्पट दंड आकारण्याचा निर्णय ससून अभ्यागत मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
ससून स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी एक स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि सरकारच्या माध्यमातून निधी उभारण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. ससूनमधील निवासी वसतिगृह, कर्मचारी वसाहत तसेच जुन्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत एक आराखडा तयार करून तो सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ससूनच्या अकरा मजली इमारतीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे खर्च होऊ शकला नाही, याबाबत बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.