सस्पेन्स संपणार; १२ आमदारांची यादी आज जाणार राज्यपालांकडे

0

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावावरून तर्क-वितर्क सुरु आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ उमेदवारांची शिफारस मंजूर करण्यात आली आहे. राज्य सरकारने पाठविलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल निवड जाहीर करतात. मंत्रिमंडळ बैठकीत यादी मंजूर झालेली असतांना नावे जाहीर करण्यात आलेली नाही, कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने तर्क-वितर्क लढविले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे १२ नावांची यादी सुपूर्द करणार आहे. त्यामुळे आज विधान परिषदेबाबतचा सस्पेन्स संपणार आहे. बंद लिफाफ्यात ही नावे पाठविण्यात येणार आहे.

१२ जागांसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यानंतर राजू शेट्टी, आनंद शिंदे यांची नावे निश्चित मानली जात आहेत. शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेते शरद पोंक्षे, नाशिक जिल्हा प्रमुख करंजकर यांची नावे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. मात्र उर्मिला मातोंडकर यांच्या नावावरून शिवसेनेत दुमत निर्माण झाले आहे. दरम्यान कोणाची वर्णी लागते? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.