सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्री विजय देशमुख गटाने सुभाष देशमुख गटाला पिछाडीवर टाकले आहे. राज्यात चौथ्या क्रमांकावर गणल्या जाणाऱ्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर सहकारमंत्र्यांच्या गटाचे १५ पैकी १३ उमेदवार पिछाडीवर आहेत.
दोनच उमेदवार आघाडीवर
केवळ दोन उमेदवारांना मतांची आघाडी मिळू शकली आहे. सहकारमंत्री गटाच्या विरोधात स्वतः पालकमंत्री विजय देशमुख हे एका गटातून उभे होते. त्यांची विजयाकडे एकतर्फी वाटचाल सुरू आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात पालकमंत्री देशमुख यांच्या मदतीने काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आव्हान उभे केले होते. यात त्यांची मोठी सरशी होत असल्याचे मतमोजणीतून स्पष्ट होत आहे.
बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांविरूध्द ३९ कोटींचा कथित घोटाळा केल्याप्रकरणी निवडणुकीच्या तोंडावर झालेली फौजदारी कारवाई आणि शेतकऱ्यांना मतदानाचा दिलेला अधिकार हे मुद्दे निवडणूक प्रचारात फिरत होते. फौजदारी कारवाईत सहकारमंत्री देशमुख यांचे पारंपरिक विरोधक माजी आमदार व बाजार समितीचे तत्कालीन सभापती दिलीप माने यांचाही समावेश आहे. परंतु ही कारवाई सहकारमंत्री देशमुख यांच्या सूडबुध्दीच्या राजकारणातून झाल्याचा मुद्दा शेतकरी मतदारांना ठासून सांगण्यात व त्यांची सहानुभूती मिळवून मतांचा कौल घेण्यात दिलीप माने व त्यांचे समर्पक यशस्वी ठरल्याचे दिसून आले. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या बाजार,समितीच्या निवडणुकीचा विचार केला तर ही सहकारमंत्री देशमुख यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.