2300 पैकी 950 संस्थांचे अहवाल
पिंपरी-चिंचवड : शहरामध्ये 2300 सहकारी गृहरचना संस्था आहेत. मात्र अवघ्या 700 संस्थांनी लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल सहकार खात्याकडे पाठविला होता. 2016-17 या आर्थिक वर्षात 950 संस्थांनी आपला अहवाल सहकार खात्याला सादर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 15 टक्के असली, तरीही ज्या संस्थांनी लेखापरीक्षणाचा अहवाल अद्याप सादर केलेला नाही. त्यांना नोटीसा पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती सहकार खात्याचे उपनिबंधक प्रतिक पोखरकर यांनी दिली.
पदाधिकार्यांची उदासिनता
शहरातील एक हजार 350 सहकारी गृहरचना संस्थांनी 2016-17 या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर केलेला नाही. त्यांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सहकार विभागाकडून सहकारी गृहरचना संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक संस्थांचा ठावठिकाणा सापडला नव्हता. संस्थेच्या पदाधिकार्यांना पाठवलेल्या नोटिसा देखील परत आल्या होत्या. सहकार विभागाने अशा ठिकाणी कर्मचारी पाठवून शहानिशा केली होती. सहकारी गृहरचना संस्थांवर सहकार खात्याने लेखापरीक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र, त्यालाही काही संस्थांच्या पदाधिकार्यांनी सहकार्य केले नव्हते. त्यामुळे त्यांचा लेखापरीक्षणाचा अहवाल पूर्ण होऊ शकला नव्हता.
ज्या संस्थांनी लेखापरीक्षणाचा अहवाल अद्याप सादर केला नाही. त्यांना नोटिसा पाठविण्यात येणार आहे. गेल्यावर्षीही नोटिसा बजावल्या होत्या. नोटिसा पाठवूनही ज्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्या संस्थांवर अवसायकाची नेमणूक करण्याची तयारी केली होती. शहरातील सहकारी गृहरचना संस्थांमध्ये लेखापरीक्षणाबाबत चांगली जागरूकता आली असल्यामुळे 2016-17 या आर्थिक वर्षांमध्ये लेखापरीक्षण सादर करणार्या संस्थांच्या संख्येत वाढ झाली आहे.
-प्रतीक पोखरकर, उपनिबंधक