पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने कर्मचारी सहकारी महिलेशी गैरवर्तन केले होते. संबंधित महिलेने याची तक्रार आयुक्तांकडे केल्यानंतर हे प्रकरण विशाखा समितीकडे चौकशीसाठी पाठविले होते. समितीची चौकशी पूर्ण झाली असून त्यांनी अहवाल दिला आहे. त्यात संबधित अधिकारी दोषी आढळला असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गैरवर्तन केल्याचा प्रकार पाच महिन्यापूर्वी उघडकीस आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या अधिकार्याने प्रशिक्षणासाठी बाहेर असताना आपल्यासोबत गैरवर्तन अशी तक्रार संबधीत महिलेने आयुक्तांकडे केल्यानंतर ते प्रकरण महिला तक्रार निवारण समितीकडे चौकशीसाठी देण्यात आले. समितीने तब्बल पाच महिने या प्रकरणाची चौकशी केली. समितीकडून चौकशी पूर्ण करण्यात आली असून त्यात हा अधिकारी दोषी आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्त म्हणाले, तक्रार निवारण समितीने प्रकरणाची चौकशी करून अहवाल 18 नोव्हेंबरला सादर केला आहे. तो आपल्याकडे प्राप्त झाला असून आपण पाहिला नाही. त्यात संबंधित अधिकारी दोषी आढळला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस समितीने केली आहे. अहवालानुसार त्या संदर्भात लवकरच योग्य ती कारवाई प्रस्तावित केली जाईल