बारामती । सहकारी साखर कारखाने व खासगी साखर कारखाने यांच्यातील तीव्र स्पर्धेमुळे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या नियोजनअभावावर दैनिक जनशक्तिने वेळावेळी आवाज उठविला आहे. खासगी साखर कारखान्यांचा गोपनियतेचा व सुरक्षिततेचा झटका सोमवारीच एका मान्यवरास व ठेकेदारास बसल्यामुळे खरे स्वरूप उघड होत चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकर्याची काय अवस्था होईल, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
एका खासगी साखर कारखान्यावर एका संस्थेचे अध्यक्ष गेले असता त्यांना या कारखान्यावरील कडेकोट असणारी सुरक्षाव्यवस्था पाहूनच धक्का बसला. एवढेच नव्हे तर त्यांना भेटीसाठी तब्बल दोन तास ताटकळत उभे राहावे लागले. याचबरोबर येथे काम करणार्या ठेकेदारासही बराच वेळ ताटकळत उभे रहावे लागले. सर्वसामान्य सभासद सहकारी साखर कारखान्यात सहजतेने जावून आपल्या अडीअडचणी मांडू शकतात व सोडवू शकतात. तसेच सहकारी साखर कारखान्यांच्या अध्यक्षास व संचालक मंडळास सहजतेने भेटून चर्चा करू शकतात हा लोकशाहीचा हक्क खासगी साखर कारखान्यात अजिबात दिसत नाही, अशी प्रतिक्रिया या मान्यवरांनी दिली आहे.
खासगी साखर कारखाने कसे चालवावे याचे प्रशिक्षण फलटण तालुक्यातील कारखान्यात जावून घ्यावे, असे श्रीछत्रपती सहकारी साखर कारखान्याच्य गळीत हंगाम प्रसंगी समारंभात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिररित्या सांगितले. मग नेमके कोणते प्रशिक्षण घ्यायचे याविषयी त्यांनी स्पष्ट काही सांगितले नाही. लोकशाहीत स्वातंत्र्य असते ते स्वातंत्र्य खासगी साखर कारखान्यात आहे का? याचे उत्तर शोधावे लागेल. हा एक नवीनच प्रश्न तयार झाला असून खासगी साखर कारखान्यातील अन्यायाबद्दल दाद कोणाकडे मागायची हे अवघड आहे.
सहकारी कारखानदारी टीकविण्याचे प्रयत्न
आपली भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य खासगी साखर कारखान्यात मिळणार का? हाही प्रश्न तयार झाला आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सात ते बारा तास चालतात. यात कारखान्याच्या कारभारवर चांगलीच चर्चा होत असते व या चर्चेची घुसळण निश्चितच फायदेशीर असते. व प्रत्येक सभासदाला बोलण्याचा अधिकारही असतो. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी टिकलीच पाहिजे. यासाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. असे मत सहकारातील जाणकारांनी बोलताना व्यक्त केले आहे.
विकासाच्या कल्पना बदलताहेत
भविष्यकाळात सहकारी साखार कारखानदारी व खासगी साखर कारखानदारी यांच्यातील रेषा स्पष्ट होताना दिसत आहे. सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकर्यांना याची अजूनही चाहूल लागलेली नाही. धनदांडगा ऊस उत्पादक शेतकरी व सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातही तफावतीच्या रेषा व विकासाच्या कल्पना बदलताना दिसत आहेत. भविष्यात हा संघर्ष काय स्वरूप घेणार आहे हे येणारा काळच ठरवेल, असेही शेतकरी आपापसात बोलताना दिसत आहेत.