बारामती। (वसंत घुले) बारामती व इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखाने व खासगी साखर कारखाने यांच्यातील ऊस पळवापळवीची स्पर्धा अतिशय तीव्र होत आहे. भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राातील आज अखेरपर्यंत जवळपास 80 हजार टन ऊस खासगी साखर कारखान्यांनी पळविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. छत्रपती साखर कारखान्याच्या गाळप हंगाम प्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी भावनीक आवाहन केले होते की, या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एक टिपरूही बाहेरच्या कारखान्यांना दिले जाणार नाही. या त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीच्याच पदाधिकार्यांनी हरताळ फासला आहे. अगदी दिवसाढवळ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आजीमाजी संचालकांच्या ऊसाच्या फडात खासगी साखर कारखान्याच्या टोळ्या ऊस तोडत आहेत. हे पवारांना समजत नाही काय? असा सवाल सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत.
कारखान्याच्या कारभारावर शंका
छत्रपती कारखान्याच्या वाढीव विस्तारीकरणानंतर कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालेल अशी आपेक्षा होती. मात्र, नवीन साखर कारखाना प्रतिदिनी अवघ्या एक हजार ते आकराशे टन गाळप क्षमतेने चालू आहे. नवीन साखर कारखान्याचे राहीलेले आर्धवट कामही सध्या सुरू आहे. मात्र अत्यंत घाईघाईने गाळप हंगाम शूभारंभ उरकण्यात आला. कारखान्याचे काम पूर्ण होण्याचे गरजेचे असताना एवढ्या घाईत शुभारंभ का घेतला गेला? हाही प्रश्नच आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाला. खासगी साखर कारखान्यांची पर्यायी यंत्रणा हे सर्व घडवून आणते की काय? अशी शंका घेण्याइतपत छत्रपती कारखान्याच्या कारभारावर सभासदांनी घेतली आहे.
इंदापूरवर खासगी कारखान्यांचा डोळा
इंदापूर तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखान्यांना तीन खासगी साखर कारखान्यांनी घेरलेले आहे. इंदापूर तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहेत. सध्याच्या परिस्थितीत इंदापूर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र चांगलेच आहे. त्यामुळे या तालुक्यावर खासगी साखर कारखान्यांचा डोळा असणे साहजिकच आहे. त्यामुळे येथेही हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यांना धोका निर्माण झाल्याची लक्षणे आहेत. ऊस क्षेत्र दुष्काळी परिस्थितीवेळी कमी असेल तेव्हा मात्र सहकारी साखर कारखाने व खासगी कारखाने यांच्यातील स्पर्धा जीवघेणी स्वरूपाची असेल यात कुठलीही शंका नाही.
ऊस देण्यासाठी राजकीय दबाव
इंदापूर तालुक्यातील उजणी धरणाच्या क्षेत्रात ऊस उत्पादकांकडे खासगी साखर कारखान्यांच्या टोळ्या कार्यरत आहेत. येथील ऊस उत्पादक शेतकर्यांना आपल्याच कारखान्याना ऊस देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून राजकीय दबाव येत असून तशा स्वरूपाचेे फोनही येत आहेत, असे एका शेतकर्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. साहजिकच हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यांना या स्पर्धेस तोंड द्यावे लागणार आहे. खासगी साखर कारखान्यांचा शेतकर्यावर एवढा दबाव आहे की गावातील व तालुक्यातील एका विशिष्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांची फळी कार्यरत आहे. हे कार्यकर्ते एनकेन प्रकारे खासगी साखर कारखान्यांना ऊस घालावे यासाठी आवाहन करीत आहेत.