पुणे : सध्या राज्य सरकारच्या सहकार चळवळ व सहकारी संस्थांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदोष असल्याने राज्यातील अनेक चांगल्या सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या आहेत. सहकार चळवळ हीच राज्याच्या अर्थकारणाचा मजबूत कणा असल्याने राज्यसरकारने आपल्या विचारात बदल करावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उरुळी कांचन येथे केले. उरुळी कांचन येथील डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव सांगता सोहळा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे होते.
जिल्ह्यातील संस्थांच्याकडून कर वसूल?
केंद्र सरकारवर निशाना साधताना पवार म्हणाले, केंद्र सरकार सत्तेवर आल्यापासून आरबीआय, न्यायव्यवस्था अशा सर्वच स्वायत्त संस्थांच्यावर हल्ले चढवून, संस्थांना खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ही बाब देशाच्या दृष्टीने घातक आहे. काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटाबंदी केली. मात्र काळा पैसा बाहेर आलाच नाही. हे खुद्द आरबीआयच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. सहकारी संस्थाच्या उत्पन्नावर संपूर्ण देशात प्राप्तिकर माफ असताना, पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्याकडून तो वसूल केला जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. यासंदर्भात चालू अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
आर्थिकदृष्ट्या सबळ संस्थाही अडचणीत…
शरद पवार म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने, आर्थिकदृष्ट्या ही दोन्ही राज्ये आजपर्यंत आघाडीवर राहिली आहेत. यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगीळ, वैकुठभाई मेहता यांच्यासारख्या लोकांनी तळागाळापर्यंत सहकार पोहचवल्यानेच, ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, दुधसंस्था, बँका, पतपेढ्या यांसारख्या मोठमोठ्या सहकारी संस्था उभ्या राहिल्या. ग्रामीण भागाचा विकास झाला, हे सत्य कोणालाही नाकारून चालणार नाही. मात्र सध्याचे सत्ताधारी या सहकारी संस्थाकडे दुषित नजरेने पाहत असल्याने आर्थिकदृष्ट्या सबळ सहकारी संस्थाही अडचणीत येऊ लागल्या आहेत. या संस्था अडचणीत आल्या तर सर्वसामान्य माणसे अडचणीत येणार आहेत.
सोहळ्याला उपस्थित मान्यवर…
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परीषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग थोरात, निसर्गोपचार ग्रामसुधार केंद्राचे विश्वस्त डॉ. एन. जी. हेगडे, उरुळी कांचन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा कांचन, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सचिव सोपान कांचन, विश्वस्त महादेव कांचन, देविदास भन्साळी यांच्यासह या कार्यक्रमाचे संयोजक व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, मुख्यव्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर, संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.