सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस, राष्ट्रवादीमधून मोठ्या प्रमाणात आमदार, माजी आमदार, खासदारसह अनेक राजकीय नेते बाहेर पडले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले. त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग वाढली आहे. आज बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदारासह मनसे, भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

सहकार क्षेत्रातील मोठे नाव असलेले माजी आमदार सीताराम घनदाट यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार घनदाट यांनी परभणीमधील गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष आहेत.

गेल्या आठवड्यात अनेक मराठी कलावंतांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता दगडू फेम प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश होता.

मनसेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे, रायगड, पालघर संपर्कप्रमुख डॉ. ओमकार हरी माळी आणि उद्योजक पंकज सिन्हा यांनी गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तर नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.