सहकार क्षेत्रातील सारस्वत बँकेचे शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण

0

तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वात आधी सुरू केलेली बँक आता लवकरच १ लाख कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार पाडेल

नवी मुंबई । सारस्वत बँकेने विश्‍वसनीयता आणि प्रामाणिकपणा जपला म्हणूनच आज सारस्वत बँक सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे. बँक आता ५५००० कोटींची असून ती लवकरच १ लाख कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार पडेल, असा मला विश्‍वास आहे. क्रेडिट कार्ड, प्री पेड कार्ड आणि गिफ्ट कार्डचा प्रारंभ केल्याबद्दलही मी त्यांचे अभिनंदन करतो. सारस्वत बँकेने तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वात आधी सुरू केलेला आहे. त्यामुळे त्यांची प्रगती झपाट्याने झालेली आहे. बँकेने ग्राहकांमध्ये विश्‍वसनीयता निर्माण केल्यामुळेच बँक शंभर वर्षाचा पल्ला गाठू शकली, अशा शब्दात सारस्वत बँकेचा गौरव रस्ते, वाहतूक, जहाजबांधणी, जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केला.

क्रेडिट, गिफ्ट, प्री पेड कार्डचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी सारस्वत बँकेचा शतकमहोत्सवी शुभारंभ सोहळा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू, रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, व्यवस्थापकीय संचालक स्मिता संधाने उपस्थित होते. यावेळी सारस्वत बँकेच्या क्रेडिट कार्ड, गिफ्ट कार्ड आणि प्री पेड कार्डचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

लवकरच बँकिंग प्रशिक्षण केंद्र
सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले की ग्राहकांचा विश्‍वास आणि प्रेम हीच बँकेची पुंजी आहे. सारस्वत बँकेला नुसते आकाराने मोठे व्हायचे नाही तर गुणवत्तेनेही मोठे व्हायचे आहे. गेल्या तीन वर्षांत बँकेने ३८,००० कोटींवरून ५५,००० कोटींचा व्यवसाय केलेला आहे म्हणजेच ४४%ने व्यवसाय वाढलेला आहे. बँक आज संचालक, सभासद, ग्राहकांच्या भक्कम पाठबळामुळे आणि कर्मचार्‍यांच्या मेहनतीमुळेच शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यामुळे आपल्या बँकेचा इतर सहकारी बँकांना फायदा व्हावा या सामाजिक भावनेतून लवकरच बँकिंग प्रशिक्षण केंद्र महाविद्यालय उभारणार आहोत.