पुणे – सहकार चळवळ मोडीत काढायचे काम सरकारचे सुरू असून त्याबरोबर बाजार कमिट्या मोडीत काढायचे काम करीत आहे. तर अदानी-अंबानीला श्रीमंत करायचे काम सुरू आहे. श्रीमंत लोक श्रीमंत होत चालली आहेत, पण मोदी आणि अमित शहांना काही देणे-घेणे नाही, असा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटस येथे श्री नागेश्वर पाटस विविध सहकारी कार्यकारी सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केला.
श्री नागेश्वर पाटस विविध सहकारी कार्यकारी सोसायटी शताब्दी महोत्सवानिमित्त
पाटस येथील शेतकऱ्यांनी सावकाराच्या दारात जाऊ नये तसेच शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावेत यासाठी, शंभर वर्षांपूर्वी गंगाजीराव शितोळे यांनी श्री नागेश्वर पाटस विविध सहकारी कार्यकारी सोसायटीची स्थापना केली होती. संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत, परंतु आजपर्यंत या संस्थेची एकदाही निवडणूक झाली नाही. ही कौतुकास्पद बाब असल्याचे अजित पवार म्हणाले.
यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्या महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवण्याचे काम झाले. सहकार चळवळ वाढले म्हणून महाराष्ट्राचा विकास होऊ शकला. शेतकऱ्यांना पिककर्ज परवडले पाहिजे यासाठी तीन लाखांपर्यंत पिककर्ज पुणे जिल्हा बँकेकडुन शुन्य टक्के दराने दिले जाते. यासाठी शरद पवार आणि आम्ही प्रयत्न केले असेही पवार यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांने इमाने-इतबारे काळ्या आईची सेवा करावी म्हणून हे कर्ज दिले जाते, असे अजित पवार यांनी सांगितले.