सहकार खाते अडचणीचेच

0

जळगाव । पोलिसांशी नेहमी काही मुद्द्यांवर संबंध आल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर गृहखाते मिळेल असे वाटत होते. मात्र ते मिळाले नाही, ग्रामविकास खात्याची अपेक्षा असताना त्यालाही मुकावे लागले. अखेर ज्या खात्याच्या विरोधात नेहमी आंदोलने केली त्या सहकार खात्यात प्रचंड अडचणी असताना, नेमके तेच खाते देण्यात मुख्यमंत्र्यांचाच वेगळाचा डाव असावा, असा राजकीय गौप्यस्फोट सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात जनता बँकेच्या वार्षिक सभेत केला आहे.

जनता बँकेकडून सत्कार
जनता सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याने गुलाबराव पाटील यांचा सत्कार या बँकेकडून करण्यात आला. मातोश्रीकडून मंत्रीपद देण्यासंदर्भात नाव पुढे करण्यात आल्यानंतर गुलाबराव पाटील यांना कोणते खाते हवे होते, याबाबत अपेक्षा व्यक्त केली होती. याबाबत रविवारी त्यांनी जळगावात या कार्यक्रमात मनमोकळेपणाने जाहिरपणे प्रथमच उलगडा केला.

मंत्रीपदाला डाग लागू देणार नाही
हे खाते देण्यात मुख्यमंत्र्यांचाच डाव असावा असे बोलताना, जहाँ चोरों का डर था, वही रात हो गयी, अशा ओळी जोडून त्यांनी अपेक्षाभंग झाल्याचे सांगितले. मंत्रीपदाला कोणत्याही प्रकारचा डाग लागणार नाही याची काळजी नेहमी घेणार, आंदोलन हा स्वभावच असून भविष्यात जळगाव जनता बँकेच्या कार्याचा आदर्श घेत काम करत राहू, असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.