सहकार चळवळ निकोपपणे पुढे जावी

0

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे प्रतिपादन

तळेगाव : राज्यातील सहकार चळवळीमुळे ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरामोहरा बदलला असून ही सहकार चळवळ अशीच निकोपपणे पुढे गेली पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार आणि सहकार चळवळीचे अभ्यासक कृष्णराव भेगडे यांनी केले. येथील मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या 21 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून भेगडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, माजी नगरसेवक गणेश भेगडे, नंदूशेठ शेलार, संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे, उपाध्यक्ष रोहिदास गाडे, ज्येष्ठ नेते वसंतराव खांडगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थेच्या सभासदांना 12 टक्के लाभांश
यावेळी बोलताना कृष्णराव भेगडे म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्तींची आर्थिक पत सहकारी संस्थामुळे वाढलेली असून, पतसंस्थांच्या आधाराने सामान्य माणूस, उद्योजक, व्यावसायिक यांच्या जीवनाला स्थैर्य आलेले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या सभासदांना 12 टक्के लाभांशाचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केली. तर संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत आदर्श शिक्षक सुदाम वाळुंज, युवा क्रिकेटपटू पंकज लालगुडे आणि शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

संयोजनात यांचा हातभार
संस्थेचे अध्यक्ष खांडगे यांनी प्रास्ताविक केले. तर संचालक राज खांडगे यांनी सूत्रसंचालन आणि संचालक अविनाश पाटील यांनी आभार मानले. वार्षिक सभा यशस्वी करण्यासाठी सचिव विनायक कदम, संचालक सुहास गरूड, खजिनदार महेंद्र ओसवाल, अविनाश पाटील, समीर खांडगे, व्यवस्थापक संदीप वाळुंज यांनी परिश्रम घेतले.