जळगाव । येथील जलशुध्दीकरण केंद्रबाबत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे धरणगावकरांची दिशाभूल करीत असून वारंवार त्यांच्याकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचे आरोप राष्ट्रवादीचे गटनेते तथा माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे यांनी केला आहे. धरणगाव येथील जलशुध्दीकरण उभारणीबाबत शिवसेनेकडून वाघमारे यांच्यावर आरोप करण्यात येत असून संबंधीत प्रकरणासंबंधी भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी हे आराोप केले आहे. शिवसेनेकडून मला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पालिकेच्या चार कोटी खर्चाच्या जलशुध्दीकरण केंद्राचे कामे तपासून कामाचे आदेश देण्याचा अधिकार नगरपालिका मुख्याधिकारी, तत्कालीन नगराध्यक्षांना देण्याचा विषय त्यांनी सभागृहात मांडून तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्राचे काम थांबविण्याचे आदेश तत्कालीन मुख्याधिकार्यांनीच दिले होते असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रेय घेण्याचा प्रयत्न
जलशुध्दीकरण केंद्रासाठी निधी मिळाल्यानंतर निवडणूकीवर डोळा ठेवून श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात जागेवरील उद्यानाचे आरक्षण कायम असतांनाच निविदा प्रक्रिया राबवून संबंधित ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले. उद्यानासाठी आरक्षीत जागेवर हा प्रकल्प झाला असता तर चार कोटीचे हे काम बेकायदेशीर ठरले असते. मात्र, याबाबत सर्वांना अंधारात ठेवले जात होते. पालिकेच्या सभागृहात जेव्हा कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना देण्यात आली तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकार्यांनी तडकाफडकी काम बंद करण्याचे आदेश दिले.
उद्यानासाठी पाठपुरावा
चार कोटी रुपये खर्चाच्या जलशुध्दीकरणाचे काम ज्या 12 एकरपैकी एक हेक्टर जागेवर प्रस्तावित करण्यात आले होते. 12 एकर जागेवर उद्यानासाठीचे आरक्षण होते. हे आरक्षण उठविण्याबाबतचा ठराव करून तो जळगाव नगररचना विभागाकडून मंजूर करून पुणे कार्यालयात पाठविण्यात आला होता. पुणे येथील संबंधित कार्यालयातून आरक्षण उठविण्याबाबत काही त्रुटी 2001 मध्येच काढण्यात आल्या होत्या. याबाबतचा पाठपुरावा पालिकेकडून नंतर करण्यात आला नाही.