भारतीय राजकारणात मुद्द्यांपेक्षा भावनांवर आधारित मतदान केले जात असल्याचे अनेकदा अधोरेखित झाले आहे. याबाबत अनेकदा चिंतादेखील व्यक्त करण्यात येते. मात्र, याचा एक भयावह पैलू नुकताच उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समोर आला आहे. मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी एका उमेदवाराने चक्क भावाचाच खून केल्याची धक्कादायक बाब तेथे घडली असून, यातून आपल्या लोकशाही प्रणालीचा घृणास्पद चेहरा समोर आला आहे.
कोणत्याही परिपक्व लोकशाही प्रणालीतल्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार व त्याच्या पक्षाने विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणे अपेक्षित असते. मात्र, भारतात दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत म्हणजेच लोकसभा ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या निवडणुका भावनिक आधारावरच लढल्या जातात ही बाब आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यातच भारतीयांची मानसिकता ‘एकतर डोक्यावर घ्या अथवा पायदळी तुडवा’, अशी आत्यंतिक टोकाची असते. यामुळे जनतेचा त्या कालखंडातला मूड लक्षात घेत मुरब्बी राजकारणी आणि त्यांचे पक्ष जनतेच्या भावनांना हात घालण्यासाठी तत्कालीन मुद्दे हाती घेत असतात. अर्थात अनेकदा हीच सहानुभूती त्यांना विजय मिळवून देण्यास हातभार लावत असल्याचे बर्याचदा अधोरेखित झाले आहे. यामुळे अनेकदा येनकेनप्रकारे सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न होत असतात. यातून अनेकदा गैरप्रकारदेखील घडतात. उत्तर प्रदेशातील ही घटनाही याच प्रकारातील आहे. या राज्यातील बुलंदशहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय लोकदलाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार्या मनोज गौतम या उमेदवाराचा भाऊ आणि त्याच्या मित्राची गोळी मारून हत्या करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. भावाच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या मनोज गौतम याला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरतीदेखील करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली. त्याचे कुटुंबीय अतिदक्षता विभागात मनोज गौतम याच्या भोवती बसल्याची छायाचित्रे सोशल मीडियावरती व्हायरलदेखील झाली. मात्र, काही तासांमध्येच हा सगळा ‘ड्रामा’ असल्याचे पोलिसांनी शोधून काढले तेव्हा थक्क होण्याची पाळी जनतेची होती. मनोज गौतम याला काहीही करून निवडणुकीत विजय मिळवायचा होता. जनतेने आपल्याला सहानुभूतीने मतदान करावे असे त्याला वाटत होते. यासाठी त्याने चक्क आपला भाऊ विनोद यालाच यमसदनी पाठवण्याचा कट रचून तो अगदी थंड डोक्याने पार पाडला. एका गुन्हेगाराला यासाठी सुपारी देण्यात आली, तर या कृत्यात मनोजचा अंगरक्षकदेखील सहभागी झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मनोजला गजाआड केले तेव्हा त्याच्या चेहर्यावर पश्चातापाचे एकही चिन्ह दिसत नव्हते. विशेष म्हणजे मनोज आणि विजय यांच्यात खूप चांगले संबंध होते. दोघांमध्ये कोणताही वाद नव्हता. तथापि, फक्त सहानुभूती मिळवण्याच्या नावाखाली त्याने आपल्या भावाची अगदी क्रूरपणे हत्या केली. पोलिसांच्या कुशल तपासामुळे हा सगळा प्रकार जगासमोर आला असला, तरी अशा प्रकारची अनेक कृत्यांना वाचादेखील न फुटल्याची शक्यता आहेच. नेमका हाच या प्रकरणाचा गंभीर पैलू आहे.
भारतीय राजकारण हे विकासाभिमुख मुद्द्यांवर कधीही लढले जात नाही. नेहमीच धार्मिक, जातीय, प्रादेशिक, भाषिक, सांस्कृतिक अस्मितांना निवडणुकीच्या काळात टोकदार करण्यात येते. अगदी उजव्यांपासून ते डाव्यांपर्यंत पक्षदेखील तिकीट वाटप करताना ‘इलेक्टिव्ह मेरिट’ म्हणून जातीलाच प्राधान्य देतात. प्रत्येक राजकीय पक्ष अमुक-तमुक महापुरुषाचा वारसा सांगणारा असतो. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष याला पद्धतशीरपणे खतपाणीदेखील घालतात. यातच ‘सहानुभूती’देखील भारतीय राजकारणात यशस्वितेचे समीकरण बनली आहे. अनेकदा सहानुभूतीच्या लाटेमुळे निवडणुकीत चमत्कारिक निकाल लागले आहेत. याचा विविध राजकीय पक्ष अथवा वैयक्तिक पातळीवर उमेदवारांना लाभ झाल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. यामुळे आजही कोणत्याही निवडणुकीत एखादा लोकप्रतिनिधी मृत्यू पावल्यानंतर त्याच्या घरातील उमेदवारालाच तिकीट देताना सहानुभूतीचाच विचार करण्यात येतो. यातील नैसर्गिक सहानुभूतीतल्या मानवी भावनेचा आपण सन्मान करू शकतो. मात्र, यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याचे कृत्य कदापिही समर्थनार्थ नाही. निवडणुकीच्या काळात अनेकदा अमुक-तमुक उमेदवारांना धमकी अथवा त्यांच्यावर हल्ले झाल्याच्या बातम्या झळकत असतात. यातील काही खर्या असल्या तरी काही राजकीय कटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा या बाबी कुजबुजीच्या पलीकडे जातही नाहीत. मात्र, मनोज गौतम याचे कृत्य याचा भयावह आयाम दर्शवणारे आहे.
देशाच्या कानाकोपर्यात राजकारणातील भाऊबंदकीची नवनवीन उदाहरणे आपल्यासमोर येत असतात. बाप-लेक, भाऊ-भाऊ, काका-पुतण्या, आई-मुलगा, अशी अगदी रक्ताची नाती राजकारणामुळे तुटल्याचे आपल्याला अनेकदा दिसून आले आहे. मात्र, निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आपल्या भावाचा ‘बळी’ देण्याचे उत्तर प्रदेशातील हे कृत्य आपल्या राजकीय आणि सामाजिक नीतीमूल्यांची दिशा भेदकपणे दर्शवणारे ठरले आहे. भारतीय नागरिकांनी यासाठी भावनेवर आधारित मतदान करणे टाळले, तरच असल्या प्रकारांना आळा बसू शकतो अन्यथा असले नवनवीन प्रकार आपल्यासमोर भविष्यात येत राहतील. अर्थात आपण सुज्ञपणे मताधिकाराचा वापर करणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे.