सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांची मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची मुदत 31 मार्च 2018 ला संपली आहे. त्यानंतर कोणताही लेखी आदेश नसताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना पुन्हा रुजू करून घेतले आहे. त्यांच्या बदलीच्या स्थगिती आदेशाची मुदत संपूनही आपण त्यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे डोईफोडे यांनी त्वरित कार्यमुक्त करावे. अन्यथा आपल्या विरोधात राज्य शासनाचा आदेश डावलल्याबद्दल न्यायालयात जावे लागेल, असा इशारा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
डोईफोडे यांनी अनेक चुकीची कामे केली
निवेदनात वाघेरे यांनी म्हटले आहे की, डॉ. डोईफोडे यांनी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त म्हणून काम करताना मनमानी पद्धतीने निर्णय घेतले आहेत. कर्मचार्यांचे नुकसान केले आहे. पालिकेच्या कनिष्ठ अभियंता यांची सेवा ज्येष्ठता यादी एकत्र करण्यासाठी शासनाचे मार्गदर्शनपर आदेश असताना डोईफोडे यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. डॉ. अनिल रॉय यांच्याकडे पदभाराचा आदेश नसताना त्यांना मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर दोन वर्षे काम पूर्ण करून दिले. डोईफोडे यांनी प्रशासन विभागात अनेक चुकीची कामे केली आहेत. त्यांच्या चुकीच्या कामाला आयुक्तांचा वरदहस्त असल्याची शंका आम्हाला येत आहे.