सहाय्यक निबंधकासह लेखापरीक्षकास कोठडी

0

जळगाव। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथील मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेची निवडणूक लावण्यासाठी संस्थेच्या चेअरमनकडून पंधरा हजारांची लाच स्वीकारणार्‍या सहकारी संस्था (दुग्ध) सहाय्यक निबंधकासह लेखापरीक्षकास गुरूवारी न्यायाधीश लाळेकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्या.लाळेकर यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पिंपळगाव हरेश्‍वर येथील भोईराज मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेची निवडणूक मे 2012 मध्ये झाली होती, त्याची मुदत संपल्यानंतर नव्याने निवडणूक घेण्यासाठी संस्थेचे चेअरमन जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालयात सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक (दुग्ध) रवींद्र गडेकर व लेखापरीक्षक मजीदखाँ कालेखाँ जमादार यांना भेटले. संस्थेची निवडणूक घेण्याबाबत विनंती केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी नेमणे व निवडणूक लावण्यासाठी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी दोघांतर्फे करण्यात आली होती. संस्थचे चेअरमन यांनी या प्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केल्यावरुन दोघांना सापळा रचुन बुधवारी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर दोघा संशयीता आज जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. पी.ए.लाळेकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर दोघांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवाना करण्यात आले आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. भारती खडसे यांनी कामकाज पाहिले.