पिंपरी-चिंचवड । काळेवाडी ते पिंपरीगाव येथील बीआरटीएस मार्गावर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून त्यातील कार टेप चोरणार्या सहा आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी पहाटे सव्वा एक वाजता घडली होती. इरफान जमशेर शेख (वय 24, रा. जय मल्हारनगर, थेरगाव), संदीप सुरेश गंभीरे (वय 21, रा. गणराज कॉलनी, थेरगाव), प्रसाद रोहिदास भापकर (वय 19, रा. रहाटणी), अविनाश विष्णुदास भुरे (वय 22, रा. काळेवाडी), राहुल शहादेव झेंडे (वय 20, रा. जय मल्हारनगर, थेरगाव), आकाश सुरेश गेजगे (वय 20, रा. गणराज कॉलनी, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिवाजी बोईनवाड व इतर नागरिकांनी याविषयी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सोमवारी रात्री सव्वा एक वाजता काळेवाडी फाटा ते पिंपरी गाव या बंद असलेल्या बीआरटीएस मार्गावर पार्कींगमध्ये लावलेल्या आठ चारचाकी गाड्यांची तोडफोड करत त्यातील दोन कारटेप आरोपींनी चोरले होते. यामध्ये 10 हजार रुपयांचे दोन कारटेप व गाड्यांचे अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास लावून सहा आरोपींना अटक केली. आरोपींना मोरवाडी न्यायालयात हजर केले असता आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव करत आहेत.