सहा दिवसांत पूर्ण केला 873 किलोमीटर सायकल प्रवास

0

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – निगडी येथील भगवान महावीर अहिंसा ट्रस्टच्या सहा स्वयंसेवकांनी सहा दिवसात तब्बल 873 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला. वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाची होणारी हानी याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे ते श्रवणबेळगोळ या मार्गावर सायकल वारी करण्यात आली. संपूर्ण मार्गावर झाडे लावा, झाडे जगवा, प्लास्टिक वापरावर बंदी, कापडी पिशव्यांना चालना यांसारखे संदेश देण्यात आले.

19 जानेवारीस प्रारंभ
पुणे ते श्रवणबेळगोळ हा सायकल प्रवास 19 जानेवारी, 2018 रोजी निगडी येथून सुरु झाला. अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या सायकल मोहिमेमध्ये प्रकाश शेडबाळे, सुधीन खोत, संजय पाटील, धनंजय शेडबाळे, संजय नाईक, प्रमोद चिंचवडे यांनी सहभाग घेतला. शीतल चौगुले यांनी मोहिमेचे व्यवस्थापन केले. सहा दिवस वाटेत विविध ठिकाणी थांबून पर्यावरण वाचविण्याचा संदेश देत ही वारी पुढे चालत राहिली. सहा दिवसानंतर 25 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता श्रवणबेळगोळ येथे सायकलवीर पोहोचले.

ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद
कर्नाटक येथील श्रवणबेळगोळ येथे गोमतेश्‍वर बाहुबली यांचा फेब्रुवारी महिन्यात महामस्तक अभिषेक होणार आहे. या कार्यक्रमासाठी कर्नाटक राज्यासह संपूर्ण देशभरातून भाविक भक्त एकत्र येतात. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण व कचरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे येणा-या नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करणे गरजेचे असल्याने ही मोहीम राबविण्यात आली. रस्त्याने जाताना ठिकठिकाणी थांबून प्लास्टिक बंदी आणि कापडी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी देखील या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.