सहा पथकांच्या माध्यमातून करडी नजर

0

जळगाव शहर मतदारसंघासाठी महापालिकेत आचारसंहिता कक्ष

जळगाव- विधानसभा निवडणुकीच्या जळगाव शहर मतदारसंघासाठी महापालिकेत आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या तीन भरारी पथकांकडून शहरातील घडामोडी तर उर्वरीत तीन पथकांकडून शहराच्या तीन नाक्यांवरील वाहनांवर करडी नजर ठेवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना सुरु केल्या आहेत. जळगाव शहर मतदारसंघासाठी महापालिकेत सतरा मजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. दिपमाला चौरे या जळगाव शहर मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी आहेत. तर मनपा उपायुक्त अजित मुठे हे सहाय्यक निवडणुक अधिकारी आहेत. पालिकेतील आचारसंहीता कक्षाचे सहाय्यक प्रमुख एच.एम. खान हे आहेत.

आचारसंहिता कक्षात 21 कर्मचारी
आचारसंहिता कक्षात एकूण 21 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 6 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. एका पथकात दोन शिफ्टनुसार दोन पथक प्रमुख, 3 पोलिस व एक कॅमेरामन अशी रचना आहे. 3 पथके फिरती भरारी पथके आहेत. ही पथके शहरात फिरुन बनर्स, ध्वज व इतर बाबत आचारसंहितेचा भंग होतो आहे का ? यावर नजर ठेवणार आहे. तसेच भंग झाल्यास त्याबाबत या पथकाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

वाहन तपासणीसाठी नाक्यांवर पथक
कुसुंबा नाका, शिरसोली नाका व मन्यारखेडा नाका येथे थांबून तेथिल संशयित वाहनांची तपासणी करणार आहेत. दारु, पैसे यावर करडी नजर राहणार आहे. त्यासाठी तीन पथक स्थिर असणार आहेत.यानतंर नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यावर व्हीव्हीटी व व्हीएसटी अशी दोन पथके देखील स्थापन केली जाणार असल्याची माहीती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नाहरकतसाठी आ.खडसेसह सहा जणांचे अर्ज
विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करताना नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. मालमत्ताकराची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी मनपात सहा जणांचे अर्ज आले आहेत.यात माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे,दुध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे,जिल्हा बॅकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर,लति शर्मा,सुनील खडके,चंदन महाजन यांचे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज आहेत.

राजकीय पक्ष,प्रतिनिधींची घेतली बैठक
विधानसभा निवडणुकीच्या जळगाव शहर मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिपमाला चौरे यांनी मनपाच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात राजकीय पक्ष आणि प्रतिनिधींची बैठक घेतली.यावेळी त्यांनी आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन केले.