नागपूर : हापकीन इन्स्टिट्यूटमार्फत राज्यातील विविध दवाखान्यांना लागणारी औषधे एकत्रित खरेदी करण्याचा निर्णय झाला असून पुढील सहा महिन्यांत सर्व आरोग्य केंद्रांना औषधी पुरवठा केला जाईल, असे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामीण भागात औषधांचा तुटवडा जाणवतो याबाबत हापकीन इन्स्टिट्यूट औषधांची खरेदी कधी करणार असा प्रश्न विचारला होता. डॉ. सावंत म्हणाले, शासनाने 168 कोटींची औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून 149 पुरवठा आदेश निर्गमित केले आहेत. तसेच आवश्यकता वाटल्यास उपचारासाठी एकूण खरेदीच्या सहा टक्के एवढी औषधांची खरेदी करण्याचे अधिकार दवाखान्यांना दिलेले आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.
हे देखील वाचा
20 डॉक्टरांचे निलंबन: महाजन
अतिरिक्त डिग्री बोगस असलेल्या 20 डॉक्टरांचे परवाने रद्द करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या डॉक्टरांची अतिरिक्त डिग्री बोगस असल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. महाजन म्हणाले, 53 डॉक्टरांच्या अतिरिक्त डिग्रीच्या प्रमाणपत्राबाबत चौकशी करण्याची कार्यवाही महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून सुरु आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
