सहा महिन्याच्या कचराप्रश्‍नी नऊ बैठका, तरीही समस्या बिकटच!

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील कचर्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कचर्‍याचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल नऊ बैठका झाल्या आहेत. मात्र, तरीही कचराकोंडी सुटण्याची चिन्हे नाहीत. कचर्‍याची समस्या गंभीर झाल्याने नागरिकांकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. सुस्तावलेल्या महापालिका प्रशासनाकडून नुसताच बैठकांचा फार्स सुरू आहे. बैठकीत ठरवलेली धोरणे प्रत्यक्ष अंमलात आणली जात नसल्याने कचर्‍याची समस्या जैसे थे असल्याचे वास्तव आहे. सोमवारी (दि. 25) रोजी पुन्हा शहरातील कचराप्रश्‍नी महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकार्‍यांची बैठक पार पडली. याही बैठकीत नेहमीप्रमाणे काही मिनिटे चर्चा रंगली, काही धोरणे ठरली. परंतु, ही धोरणे प्रत्यक्ष अंमलात येतील, याविषयी नागरिकांना शंका आहे.

भाजपची कामगिरी निराशाजनक
’अच्छे दिन’ची दिवास्वप्ने दाखवून महापालिकेच्या सत्ता काबीज करणार्‍या भाजप पदाधिकार्‍यांनी नुकताच सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मात्र, सहा महिन्यात भाजपची कामगिरी निराशाजनक असून, अजूनही त्यांना सूर सापडेनासा झाला आहे. त्यामुळे मूलभूत समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. ठेकेदारराज, अनअनुभवी पदाधिकारी, नवखे नगरसेवक आणि कामचुकार प्रशासकीय अधिकारी यामुळे मूलभूत समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

कोट्यवधींचा खर्च करुनही उपयोग नाही
गेल्या सहा महिन्यात स्थायी समितीने कचर्‍यांसदर्भातील विविध प्रस्ताव मार्गी लावले. त्यात घरोघरचा कचरा गोळा करणे, कचर्‍याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणे, कचरा डेपोतील कचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे, हॉटेलातील टाकाऊ अन्नपदार्थांपासून बायोगॅस बनविणे आदी प्रमुख विषयांचा समावेश आहे. या कामांसाठी येणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या खर्चास मान्यताही दिली आहे. तरीही शहरातील कचराकोंडी सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही कचरा समस्या अधिकच गहन होत आहे.

बैठकांचे सत्र असे
25 एप्रिल रोजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी आरोग्य समस्येसंदर्भात आढावा बैठक घेतली. त्या पाठोपाठ 4 मे रोजी महापौर नितीन काळजे, सभागृहनेते एकनाथ पवार यांनी याच विषयावर बैठक घेतली. 13 मे रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक-अधिकार्‍यांची बैठक पार पडली. 18 मे रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर अधिकार्‍यांची बैठक घेतली. 23 मे रोजी आयुक्त-महापौरांनी ‘ओला कचरा-सुका कचरा’ या विषयावर बैठक घेतली. 24 जुलै रोजी पुन्हा आरोग्यविषयक बैठक घेण्यात आली. 29 ऑगस्ट रोजी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी कचरा प्रश्नावर बैठक घेतली.