डॉक्टर व कर्मचार्यांच्या शिस्तीवर भर
पिंपरी :– पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती अर्थात वायसीएमएच रुग्णालय गोरगरीबांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. या रुग्णालयात पुणे जिल्ह्याच्या परिसरातील हजारो नागरिक उपचारासाठी येतात. त्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून आगामी सहा सहा महिन्यात रुग्णालयाचा कायापालट करुन अधिकाधिक रुग्णाभिमुख सेवा देवू, अशी प्रतिक्रिया वायसीएमचे नवनिर्वाचित उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. संत तुकारामनगर येथील या रुग्णालयाच्या उपअधीक्षकपदी नुकतीच डॉ. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी यापूर्वी वायसीएमसह भोसरी येथील रुग्णालयासह पिंपरीतील जिजामाता, चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात सेवा केली आहे.
आवश्यक त्या सुधारणा करणार
डॉ. जाधव म्हणाले की, पिंपरी-चिंचवड, पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. या 750 खाटांची रुग्णालयाची क्षमता आहे. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्यांच्या शिस्तीवर भर दिला जाईल. आयकार्ड, अॅपरनची सक्ती डॉक्टरांना करण्यात आली आहे. विभागनिहाय डॉक्टरांची नुकतीच बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार, आवश्यक त्या सुधारणा करण्याचे काम सध्या हाती घेतले आहे. अपुर्या मनुष्यबळामुळे वायसीएम रुग्णालयावर ताण येतो. डॉक्टर कर्मचार्यांसाठी साहित्य सामुग्रीची कमतरता आहे. अनेक वैद्यकीय उपकरणे बंद आहे. त्यांची तात्काळ दुरुस्ती करुन ते वापरात आणण्यावर भर दिला आहे. रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाभिमुख सेवा देण्याचा आपला प्रयत्न राहील.
शस्त्रक्रीया कक्षाचे काम पूर्ववत
वायसीएम रुग्णालयात दररोज 40 ते 50 शस्त्रक्रिया होतात. मात्र, 16 पैकी 9 शस्त्रक्रिया टेबल नादुरुस्त झाले होते. 14 पैकी भूल देण्याच्या 8 मशिन्स बंद होत्या. शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे दिवे देखील नादुरुस्त झाले होते. त्यामुळे मागील अडीच महिन्यांपासून शस्त्रक्रिया कक्षातील कामकाजाचा खोळंबा झाला होता. निम्म्याहून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली होती. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर तक्रारींचा भडीमार होत होता. मात्र, डॉ. शंकर जाधव यांनी उपअधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच शस्त्रक्रिया कक्षातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला. परिणामी, या कक्षाचे कामकाज पूर्ववत सुरु झाले आहे.