सहा महिन्यात भुसावळातील मामाजी टॉकीज रस्त्याची वाताहत

0

सत्ताधार्‍यांच्या आश्‍वासन व गुणवत्तेवरच प्रश्‍नचिन्ह ; माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आश्‍वासनाला ठेकेदाराकडून हरताळ ; 40 वर्षांऐवजी अवघ्या सहा महिन्यात ट्रीमीक्स रस्त्याचा लेअर उखडला ; चौकशीच्या ससेमिर्‍यानंतर ठेकेदाराकडून वरवर मलमपट्टी

भुसावळ- तब्बल 57 वर्षांनी भाग्य उजळलेल्या शहरातील वर्दळीच्या मामाजी टॉकीज रस्त्याचे शहरात प्रथमच टीमीक्स पद्धत्तीने काम करण्यात आले होते. तब्बल 40 वर्ष या रस्त्याची डागडूजी करण्याची गरज भासणार नाही, अशा पद्धत्तीने काम केले जाईल, असे आश्‍वासन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी 5 ऑगस्ट 2018 रोजी रस्ता कामाच्या शुभारंभप्रसंगी दिले होते मात्र रस्ता कामाच्या अवघ्या सहा महिन्यानंतरच रस्ता कामाचा दर्जा उघड झाला असून ट्रीमीक्स रस्त्याचा पहिला लेअर उखडल्याने रस्त्याची पार वाताहत झाल्याने वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सत्ताधारी व माजी मंत्र्यांच्या आश्‍वासनाला खुद्द ठेकेदारानेच हरताळ फासल्याचा प्रत्यय शहरवासीयांना आला असून जिल्हाधिकार्‍यांकडे झालेल्या तक्रारीनंतर चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागताच रस्त्याच्या डागडूजीला प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करून शासन निधीचा झालेला अपव्यय भरून काढावा, अशी मागणी सुज्ञ शहरवासीयांमधून पुढे आली आहे.

सत्ताधार्‍यांनी आपल्याच माजी मंत्र्यांनाच पाडले तोंडघशी
तत्कालीन सत्ताधार्‍यांनी निधीचा अपव्यय करीत शहराचा विकास होवू दिला नाही, असे सांगत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पालिकेतील विरोधकांची सत्ता उलथवून लावून पालिकेत भाजपाचे कमळ फुलवले खरे मात्र गेल्या काही वर्षांच्या काळात शहराचा अपेक्षित विकास हा झालेला नाही हेदेखील तितकेच खरे! केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना अमृतचा शुभारंभ झाला असलातरी दोन वर्षानंतरही बंधार्‍याला जागा सापडलेली नाही तर अमृत योजनेमुळे निधी असूनही शहरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. एलईडी दिव्यांमुळे शहराचा अंधार दूर झाला असलातरी मूलभूत सोयी-सुविधांचा आजही शहरात अभाव आहे. दर महिन्याला कचरा उचलण्यासाठी लाखो खर्च होत असलेतरी गल्ली-बोळातील कचर्‍याकुंड्या ओसंडून वाहत आहेत त्यामुळे सत्ताधार्‍यांनी आपल्याच नेत्यांना तोंडघशी पाडले यात शंका नाही. आगामी काळात विधानसभा निवडणूक असल्याने मतदारांपुढे सत्ताधारी विकासकामांचा काय पाढा वाचतील? हा देखील सत्ताधार्‍यांना अंतर्मुख करणारा प्रश्‍न आहे.

ट्रीमीक्स रस्त्याची सहा महिन्यात लागली वाट
तब्बल 57 वर्षांनंतर मामाजी टॉकीज रस्त्याचे उजळलेले भाग्य हा तर शहरवासीयांसाठी खरोखर आनंदाचा क्षण होता शिवाय माजी मंत्री खडसेंनी अशा पद्धत्तीने शहरात प्रथमच होत असलेल्या कामामुळे सुमारे 40 वर्ष या रस्त्यासाठी पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसेल इतक्या चांगल्या पद्धत्तीने या रस्त्याचे काम होईल, असे आश्‍वासन जनतेला रस्ता कामाच्या शुभारंभप्रसंगी दिले होते तसेच नगरसेवक युवराज लोणारींच्या सहकार्यातून उभारलेल्या उद्यानाच्या शुभारंभप्रसंगीदेखील यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी विकासासाठी आलेला पैसा दुसरीकडे खर्च केल्याने शहराचा विकास झाला नाही परीणाम सत्ता परीवर्तन झाले त्यामुळे आता कामे करण्याची आमची जवाबदारी असल्याचे आश्‍वासन जनतेला दिले होते मात्र 40 वर्षांपूर्वीच अवघ्या सहा महिन्यात मामाजी टॉकीज रस्त्याच्या कामाचा सुमार दर्जा उघड झाल्याने सत्ताधार्‍यांनी आपल्याच नेत्यांना तोंडघशी पाडल्याचा प्रत्यय शहरात आला आहे.

नगरसेवक, नगरसेविका पतीच झाले ठेकेदार ?
समजलेल्या माहितीनुसार, एक कोटी पाच लाख रुपये खर्चातून मामाजी टॉकीज रस्त्याचे काम करण्यात आले. हे काम आशा कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात हे काम करण्यासाठी तीन नगरसेवक व तीन नगरसेविकांच्या पतीने पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. कागदोपत्री आशा कन्स्ट्रक्शनच्या नावानेच सुरुवातीला धनादेश काढून नगरसेवक त्यात सहभागी नसल्याचे दिसून येते मात्र यात लोकप्रतिनिधींचीदेखील भागीदारी असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

चौकशीच्या ससेमिर्‍यानंतर थातूर-मातुर डागडूजी
अवघ्या सहा महिन्यात मामाजी टॉकीज रस्त्याचे भाग्य बिघडल्याने शहरातील काही सुज्ञ नागरीकांनी जिल्हाधिकारी प्रशासनाकडे पुराव्यासह याबाबत तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी या कामाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे समजते शिवाय पालिका प्रशासनाने देखील ठेकेदारांची बिले थांबवल्याने नावालाच ठेकेदाराने दोन दिवसांपासून रस्त्याच्या डागडूजीला सुरुवात केली आहे.

विरोधी जनआधारचे नगरसेवक ठरले निष्प्रभ
पालिकेतील प्रबळ विरोधी गट असलेल्या जनआधार विकास आघाडीचे शहरात तब्बल 18 नगरसेवक असतानाही त्यांच्यासह गटनेत्यांकडून शहरातील समस्यांबाबत कुठलाही आवाज उठवला जात नसल्याने हे नगरसेवकदेखील सत्ताधार्‍यांना जावून मिळाले की काय? असादेखील प्रश्‍न या नगरसेवकांना निवडून देणार्‍या मतदारांमधून उपस्थित होत आहे. शहरात विविध समस्या आ वासून उभ्या असतानाही जनआधारचे नगरसेवक हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

चौकशीबाबत कल्पना नाही- नगराध्यक्ष
मामाजी टॉकीज रस्त्याच्या कामाबाबत चौकशी लागली आहे वा ना याबाबत आपल्याला कल्पना नाही, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने ते पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.