नंदुरबारचे सहा रुग्ण कोविड संसर्गमुक्त होऊन घरी परतले

0

शहादा:नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा रुग्णांचे अखेरचे दोन कोविड_19 चाचणी अहवाल निगेटीव्ह आले असून संसर्गमुक्त झाल्याने त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. इतर 31 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. शहाद्यातील ६ पॆकी ५ पाॅझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याने शहादेकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी. सातपुते, डॉ.राजेश वसावे, डॉ.राजेंद्र चौधरी आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यापूर्वी 9 रुग्ण संसर्गमुक्त झाले असून 10 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी चार रुग्णांचे 14 दिवसानंतरच्या चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. संसर्गमुक्त झालेल्या रुग्णात शहादा येथील तीन पुरुष (वय 40, 44 आणि 48) आणि दोन मुलींचा (वय 12 आणि 15) समावेश आहे तर अक्कलकुवा येथील एका पुरुषाचा (वय 58 ) समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. वेळेवर संसर्गाचे निदान झाल्याने उपचाराअंती रुग्ण संसर्गमुक्त होत आहेत. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले असून इतरही रुग्ण लवरच संसर्गमुक्त होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
जिल्हा प्रशासनाने संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर दिला असून नागरिकांना संसर्ग टाळण्याबाबत आवाहनही सातत्याने करण्यात येत आहे. या आजारावर कोणतेही औषध सध्या उपलब्ध नसून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये सहा फूटाचे अंतर ठेवून विषाणूची श्रृंखला तोडणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास जिल्हा ग्रीन झोनमध्ये येऊन येथील इतर व्यवहार सुरळीत होऊ शकतील. त्याचबरोबर विषाणूचा प्रभाव आणखी काही काळ राहणार असून संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.