सहा हजार घरे व परिसराची आरोग्य केंद्राच्यावतीने हडपसरमध्ये तपासणी

0

हडपसर । डेंग्यू व चिकन गुनिया सदृश्य आजारांच्या रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्व्हेमध्ये डेंग्यू, चिकन गुनियासह 37 पेक्षा अधिक तापाचेरुग्ण आढळून आले आहेत.

या परिसरात थंडीताप, डोके, हातपाय, सांधे दुखणे, जुलाब, उलट्या आदी आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्या होत्या. सलग पाच दिवस 62 कर्मचार्‍यांनी हे सर्वेक्षण केले. त्यांनी 6 हजार 662 घरांची व त्याच्या परिसराची तपासणी केली. सुमारे 20 हजार भांड्यांची तपासणी केली असता त्यातील 621 भांडी डासांमुळे दूषित असल्याचे आढळले. याशिवाय परिसरात अनेक ठिकणी टायर, पाण्याच्या टाक्या, बाटल्या, संक्रांतीची सुगडी यामध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या आळ्या दिसून आल्या. त्यावर लागलीच औषध टाकून नायनाट करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये स्वच्छता तसेच आजारांबाबत प्रबोधन व्हावे, यासाठी आरोग्य केंद्रातर्फे छापील पत्रके वाटण्यात आली. आरोग्य कर्मचार्‍यांनी नागरिकांशी संवाद साधून विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

अफवांनी घाबरून जाऊ नये
नागरिकांनी कोणतेही दुखणे अंगावर न काढता प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना दाखवून घ्यावे. आजारांच्या अफवांनी घाबरून न जाता डॉक्टरांना भेटावे. आपले घर व परिसर अधिकाधिक स्वच्छ तसेच निरोगी ठेवावा. डासांची उत्पत्ती स्थाने वेळोवेळी नष्ट करावीत, असे आवाहन आरोग्य केंद्रातर्फे करण्यात आले.

आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा
आरोग्य उपकेंद्राच्या वतीने संपूर्ण मांजरी परिसराचा पाच दिवस सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये डासांची उत्पत्ती करणार्‍या टायर, बाटल्या, उघड्या टाक्या, नारळाच्या करवंट्या आदी विविध वस्तू आढळल्या आहेत. नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. स्वच्छता राखावी. आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने
डॉक्टरांना भेटावे.
– डॉ. मनिषा देशपांडे,
आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, मांजरी