सहा हजार बालके पोषण आहारापासून वंचित; मोलमजुरी करणार्‍या पालकांवरही परिणाम

0

कुरुळी-चर्‍होली अंगणवाडी सेविका संपाचा परिणाम

चिंबळी । अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना सध्या मिळणार्‍या मानधन वजा वेतनात वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता राज्यभरातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले असून यात कुरुळी बीटमधील २८ व चर्‍होली खुर्द बीटमधील २५ अशा एकूण ५३ अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी देखील सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे सोमवारी दिवसभर त्यांनी या परिसरातील अंगणवाड्या बंद ठेवत या राज्यव्यापी बेमुदत संपात आपला सहभाग नोंदवला.

अंगणवाडी कर्मचारी म्हणाले की, राज्य शासनाने मानधनवाढीसाठी ऑगस्ट २०१६ मध्ये समिती गठित केली होती. या समितीने अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवाज्येष्ठता व शिक्षणाधारित मानधनवाढ देण्याची किंवा मानधनात दुपटीने वाढ करण्याची शिफारस मार्चमध्ये शासनाकडे केली; परंतु अद्याप मानधनात वाढ झाली नाही, म्हणूनच हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

पोषण आहारात अडचणी
या संपामुळे कुरुळी बीटमधील चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, माजगाव, चर्‍होली केंद्रातील केळगाव, चर्‍होली, सोळू, धानोरे, वडगाव घेनंद,मरकळ, गोलेगाव, सोळू, पिंपळगाव, धानोरे, कोयाळी आदी गावे व वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ५३ अंगणवाड्या बंद राहिल्याने अंदाजे सहा हजार बालकांना पोषण आहार व मूल्य शिक्षणापासून वंचित राहावे लागले, तसेच मोलमजुरी करून पोट भरणार्‍यांना कामाचा खाडा करून आपल्या मुलांना सांभाळावे लागले. यामुळे संपाबाबत सर्व सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने अंगणवाडी ताईंच्या रास्त मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात आमच्या मुलांच्या संगोपनात, मूल्य शिक्षणात, पोषण आहारात अडचणी निर्माण होऊ देऊ नये, असे मत पालकांनी व्यक्त केले.

५३ अंगणवाडी सेविका
कुरुळी-चर्‍होली परिसरातील सुमारे ५३ अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी वेतनवाढीची मागणी करत बेमुदत संपावर गेले असून याबाबत निवेदन देण्यात आले असल्याचे खेड कुरुळी अंगणवाडी बीट प्रकल्प अधिकारी सूर्यकांत काटे व पर्यवेक्षिका दमयंती कुलकर्णी तसेच चर्‍होली खुर्द अंगणवाडी बीटचे प्रकल्प अधिकारी डी.डी. कुलकर्णी व पर्यवेक्षिका गायत्री टिकले यांनी सांगितले.