पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील नळजोडाला मीटर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला महिन्याला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याची योजना फसवी आहे. सहा हजार लिटर पाणी नागरिक पाच ते सात दिवसांतच वापरतात. त्यानंतर एक हजार लिटर पाण्याला 8 रुपयांप्रमाणे नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पाण्याचे दर पूर्वीप्रमाणेच ठेवण्याची मागणी, शिवसेनेच्या शहरसंघटिका सुलभा उबाळे यांनी महापौर नितीन काळजे यांना निवदेनाद्वारे केली आहे.
पाचपटीने दरात वाढ!
या निवेदनामध्ये उबाळे म्हणाल्या की, स्थायी समितीने शहरवासियांना सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. याआधी प्रतिदिन एक हजार लिटरला दोन रुपये 50 पैसे इतका दर होता. तो दर 30 हजार लिटरपर्यंत कायम होता. त्यानंतर 30 हजार 1 लिटरच्यापुढे पाच रुपये 50 पैसे इतका दर होता. दोन्ही दरांचे एकत्रीकरण केल्यास 7.50 पैसे इतका होता. त्यामुळे स्थायीने मोफत सहा हजार लिटर पाणी या नावाखाली लोकांची दिशाभूल केली असून 8 ते 35 रुपये इतकी वाढ केली आहे. हा दर पुर्वीच्या दराच्या पाचपट वाढीव आहे.
नागरिकांना विनाकारण भुर्दंड!
सहा हजार लिटर पाणी नागरिक पाच ते सात दिवसातच वापरतात. याचाच अर्थ आठव्या दिवसानंतर प्रति एक हजार लिटरला आठ रुपयांप्रमाणे नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. हा मोठा भुर्दंड असून तो नागरिकांनी कशासाठी सहन करायचा? असा सवाल उबाळे यांनी उपस्थित केला आहे.
मोफत पाणी योजना फसवी!
शासन परिपत्रकाप्रमाणे दररोज दरडोई 135 लीटर पाणी देणे बंधनकारक आहे. सरासरी एका कुटुंबात पाच व्यक्ती पकडल्यास 675 लीटर पाणी दिले जाते. यामुळे स्लॅब 8 ते 35 रुपये प्रति हजार लीटर असल्याने आत्ताच्या बिलाच्या पाचपट बिल येईल. त्यामुळे सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी ही योजना फसवी आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणे असलेले दर कायम ठेवण्यात यावेत. जेणेकरुन नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार नाही. याची दक्षता घ्यावी, अशी मागणी उबाळे यांनी निवेदनातून केली आहे.