अनिकेत कोथळे हत्याप्रकरण भोवले; दीपाली काळे यांचीही बदली; महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना मात्र अभय
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या सांगली येथील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची नागपूरला तर उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची सोलापूरला गुरुवारी उचलबांगडी करण्यात करण्यात आली. राज्याच्या गृह विभागाने दोघांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी जारी केले. शिंदे यांची राज्य राखीव दलाच्या समादेशकपदी (नागपूर) येथे बदली करण्यात आली आहे. आता सांगली पोलिस अधीक्षकपदी कोल्हापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात कोल्हापूर क्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना मात्र अभय देण्यात आले आहे. तेथील जनतेने नांगरे पाटील यांच्या बदलीची मागणी करूनही त्यांना सरकारने अभय दिले.
आतापर्यंत 12 पोलिस निलंबित
सांगलीच्या अपर पोलिस अधीक्षकपदावर काम करत असलेल्या डॉ. दीपाली काळे यांच्याकडे सोलापूर शहर उपायुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी अपर पोलिस अधीक्षकपदी अशोक वीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वीरकर सध्या नांदेडमधील देगलूर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम करत होते. चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात घडली होती. या प्रकरणात अनिकेत पोलिस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. मात्र सखोल चौकशीनंतर अनिकेतचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबा घाटात नेऊन जाळल्याची धक्कादायक बाबही उघड झाली होती. याप्रकरणी आतापर्यंत 12 पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, प्रमुख आरोपी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह 5 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.