सांगलीच्या बैठकीकडे लक्ष

0

पिंपरी । विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात रेशनिंग दुकानदारांनी राज्यव्यापी बेमुदत संपाची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या बुधवारी (दि. 23) सांगलीत संघटनेची राज्यस्तरीय बैठक आयोजित केली आहे. या संपाबाबत संघटना नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे राज्यभरातील रेशनिंग दुकानदारांचे लक्ष लागले आहे. तामिळनाडूच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करून धान्याच्या पोत्याला पाचशे रुपये मिशन द्यावे, धान्य विक्रेत्यांना मानधन मिळावे, गाडीभाडे, हमाली मिळावे, अशा विविध मागण्या प्रलंबित आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून या मागण्यांसाठी आंदोलन करुनही राज्य सरकारकडून गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. देशात 2013 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर राज्य सरकारला केवळ हे धान्य विक्रेत्यांपर्यंत पोचविण्याचे काम राहिले आहे. मात्र, हे एकमेव कामदेखील अन्नपुरवठा विभागाकडून केले जात नाही. विक्रेत्यांकडूनच हमाली व गाडीभाडे आकारले जात आहे. यामुळे विक्रेते मेटाकुटीस आले आहेत. या विक्रेत्यांचा चरितार्थासाठी ग्रामीण भागातील विक्रेत्यांना 40 हजार रुपये तर शहरी भागातील विक्रेत्यांना 50 हजार मानधन सुरु करण्याची संघटनेची आग्रही मागणी आहे.