लोकसभा निवडणूक : संसदीय मंडळाच्या सदस्यांशी चर्चा
सांगली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सांगलीत काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या निरीक्षक सदस्यांसमोर उमेदवार बदलण्याच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बंद खोलीमध्ये 45 सक्रिय सदस्यांनी आपली मते निरीक्षक आणि जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्या समोर मांडली आहेत. सध्या माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते, सहनिरीक्षक संजय पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सदाशिवराव पाटील, विक्रम सावंत, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, प्रा. सिद्धार्थ जाधव, संजय मेंढे, वहिदा नायकवडी यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवाराच्या नावाच्या चर्चेची बैठक पार पडली आहे.
डॉ. कदम यांनी उमेदवारी नाकारली
पृथ्वीराज पाटील यांनी संपूर्ण सांगलीचा मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांनी लोकांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वतःच्या उमेदवारीबद्दल ही त्यांनी लोकांना विचारणा केली आहे, असे बैठकीला उपस्थित काँग्रेस पदाधिकार्यांनी सांगितले आहे. याच बैठकीत डॉ. विश्वजीत कदम यांनी मात्र आपण सांगली लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी इच्छुक नाही, असे म्हणत लोकसभा उमेदवारीस नकार दिला आहे. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनाच उमेदवारी करण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्याबद्दल मोहनरावांनीही उमेदवारीबाबत नकार दिला आहे.
भाजपच्या वतीने संजय पाटील?
सध्या तरी प्रतीक पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात उमेदवारीसाठी लढत असून भाजपच्या वतीने या मतदारसंघात विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी देण्याबाबत सध्या पक्षात चर्चा सुरू आहे. संजय पाटील यांनी भाजपची उमेदवारी निश्चित मानून कामाला लागले आहेत. हा मतदारसंघ भाजप आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असून विजयाची निश्चिती मात्र आगामी काळात ठरणार्या रणनीतीवर अवलंबून असणार आहे.