सांगलीत मुलीच्या जन्माचे साखर वाटून स्वागत

0

सांगली । गर्भपाताच्या प्रकरणामुळे सांगली जिल्हा गाजत असताना स्त्री भ्रूण हत्येला सणसणती चपराक लावणारा आदर्श सांगलीतील एका कुटुंबाने घालून दिला आहे. वाळवा तालुक्यातील बागणी गावच्या कदम कुटुंबियांनी मुलीच्या नामकरण सोहळ्याला हत्तीवरुन साखर वाटत आपला आनंद साजरा केला. दुर्गा अवधूत कदम असं चिमुकलीचं नामकरण करण्यात आलं आहे. कदम कुटुंबियांच यामुळे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

काय आहे सांगलीतील गर्भपात प्रकरण?
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये स्त्री भ्रूण हत्या होत असल्याचं उघड झालं आणि पुन्हा एकदा स्त्री भ्रूण हत्येनं डोकं वर काढल्याची भीती निर्माण झाली. मात्र त्याच सांगली जिल्ह्यात मुलीच्या जन्माचं स्वागत हत्तीवरुन साखर वाटप करत करण्यात आले. सांगलीत गर्भपातादरम्यान स्वाती जमदाडे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान म्हैसाळ गावातील डॉक्टर बाबासो खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात करण्यात येत असल्याचं उघड झाले. स्वाती जमदाडेचा मृत्यू देखील म्हैसाळमधील याच भारती हॉस्पिटलमध्ये झाला होता. हॉस्पिटलजवळच्या परिसरात पोलिसांनी तपास केला असता त्यांना 19 मृत अर्भकं सापडली. बाबासो खिद्रापुरे बीएचएमएस असून मूळचा शिरोळ मधील नरवाडचा रहिवासी आहे. मागील 10 वर्षांपासून त्याचे म्हैसाळमध्ये हॉस्पिटल आहे. अनेक वर्षांपासून तो नियमबाह्य पद्धतीने गर्भपात करत असल्याचा आरोप आहे.