सांगली, धामणगावमधील घटनेच्या निषेधार्थ रास्तारोको

0

सणसवाडी । सांगली जिल्ह्यातील आरोपी अनिकेत कोथळे याला मारहाण करून खून करून त्याचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार पोलिसांनी केला. तसेच या प्रमाणे बीड जिल्ह्यातील धामणगाव येथील सचिन घाटविसवे याचा देखील कट रचून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह झाडाला टांगल्याचा प्रकार घडूनही आरोपींना अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे शनिवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा युवा संघटक राजाराम दगडे पाटील व शिरूर तालुकाध्यक्ष जयदीप सकट यांच्या वतीने नुकत्याच सांगली जिल्ह्यातील अनिकेत कोथळे याला पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व चार पोलिसांनी मारहाण करून त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला असल्याचा प्रकार घडला. तसेच बीड जिल्ह्यातील धामणगाव येथील सचिन घाटविसवे या युवकाचा कट रचून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह त्याने फाशी घेतली असल्याचे भासविण्यासाठी झाडाला टांगल्याचा प्रकार काही समाजकंटकांनी केला. या घटनेला आठ दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काही आंदोलकांनी पुणे नगर महामार्गावर ठिय्या मांडला होता. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांना देण्यात आले. याप्रसंगी राजाराम दगडे पाटील, सतीश पंचरास, जयदीप सकट, नाथा आल्हाट, शंकर काळे, सुरेश सकट, सोमनाथ पंचरास, तेजश्री पवार, प्रवीण पवार, हेमंत मसलखांब, उत्तम भिसे, महेबूब शेख, दिपक गरुड, ग्यानबा साळवे आदी उपस्थित होते.