मुंबई: गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापुरात अतिवृष्टी झाली. यात सर्वाधिक फटका सांगलीला बसला. तीन दिवसांपासून पाऊस थांबला आहे. मात्र अजूनही परिस्थिती सामान्य झालेली नाही. दरम्यान राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, सांगलीतील पूरग्रस्तांना सरकार आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले. शहरी भागातील कुटुंबियांना १५ हजार तर ग्रामीण भागातील कुटुंबियांना १० हजार रुपये मदत दिली जाणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. दोन दिवसात सांगलीतील परिस्थिती सामान्य होईल अशी माहिती दिली. पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर मदतकार्य सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाणी पुरवठा योजना सुरु करण्यावर सरकार भर देणार आहे. पाच दिवसात सांगली शहर चकाचक होईल असा दावा गिरीश महाजन यांनी केले. गणेश मंडळांनी आर्थिक खर्च न करता पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. सोशल मीडियावर अफवा पसरविली जात असून त्याकडे लक्ष देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले.