सांगली : सांगलीमध्ये अनिकेत कोथळेच्या हत्येच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता. जमावाने दगडफेक सुरू केल्याने काहीवेळासाठी एसटीची वाहतूक थांबविण्यात आली होती. औरंगाबादहून सांगलीला येणार्या एसटीवर काहींनी दगडफेक केली. काही ठिकाणी व्यापार्यांनी उत्स्फुर्तपणे दुकाने बंद ठेवली होती. सांगलीत पोलिसांविरोधात 40 संघटनांनी बंद पुकारला होता. दरम्यान, मृत अनिकेत कोथळेच्या घरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंतगराव कदम, विश्वजित कदम यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
नांगरे-पाटील, शिंदे यांच्या चौकशीची मागणी
पोलिस उपनिरीक्षक योगेश कामठेने केलेल्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत 12 पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. सांगली पोलिस दलातील प्रकार अतिशय अशोभनीय आहे. या प्रकरणात दोषी अधिकारी, कर्मचार्यांची गय केली जाणार नाही. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व सांगली पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या चौकशी मागणी होत असली तरी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.