मुंबई : सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी-म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेची कामे निधी अभावी रखडत चाललेली असतानाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 हजार 959 कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास आज मान्यता मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दोन्ही जिल्ह्यांतील 288 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे.
कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेतून एकूण 1 लाख 9 हजार 127 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण पाणी वापर 26.78 अब्ज घनफूट इतका आहे. यापैकी कोयना धरणातून 19.07 अब्ज घनफूट व कृष्णा नदीतून 7.71 अब्ज घनफूट इतका पाणी वापर नियोजित आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत या प्रकल्पाचा समावेश असून या प्रकल्पासाठी जानेवारी 2004 मध्ये 1982 कोटी 81 लाख खर्चास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
बांधकामादरम्यान दरसूचीतील बदल, जास्त दराची निविदा स्वीकृती, भूसंपादनाच्या वाढलेल्या किंमती (विशेषत: नवीन भूसंपादन कायद्यामुळे), संकल्पचित्रातील बदल, अपुऱ्या तरतुदी तसेच इतर अनुषंगिक खर्चामुळे प्रकल्प किंमतीत वाढ झाली आहे. या कारणांमुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाने 2013-14 च्या दरसूचीवर आधारित चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवाल सादर केला. या अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती-2 ची शिफारस आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या एकूण 4 हजार 959 कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास मान्यता देण्यात आली.