सांगवडेत सरपंचाच्या पतीचा खून

0

शिरगाव : चार दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणातून सांगवडेच्या सरपंच दीपाली लिमण यांचे पती नवनाथ यांचा निर्घृण खून करण्यात आला. शनिवारी रात्री ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या मंदिर परिसरात ही घटना घडली. लिमण आपल्या सहकार्‍यांसोबत मंदिराजवळ बसले असताना चार ते पाच जण बलेनो मोटारीतून (एम.एच.14एफ.एक्स.037) उतरले. नंतर त्यांनी काही कळायच्या आतच हल्ला चढवला. दरम्यान, आरडाओरड ऐकून ग्रामस्थांनी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. यानंतर तातडीने नवनाथ यांना उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रूग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेमुळे गावात रविवारी दिवसभर तणाव होता.

पाच जणांवर गुन्हा दाखल
याबाबत विश्‍वास लिमन यांनी तळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पाच संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयितांमध्ये योगेश राक्षे व गजानन राक्षे ही दोन नावे असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक राजकुमार शिंदे यांनी दिली. दरम्यान या घटनेची समजताच पोलिस अधीक्षक सुहेल हक, वरीष्ठ निरीक्षक राम जाधव, पोलिस निरीक्षक मुगुट पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात नेण्यात आला. तळेगाव पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

ग्रामदैवत मंदीरात घडली घटना
प्राप्त माहितीनुसार मयत नवनाथ अर्जुन लिमण(वय 32, रा. सांगवडे) यांचे संशयीतांबरोबर चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. याचा राग संशयीतांच्या मनात होता. दरम्यान आठवडाभरापासून ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त गावात अखंड हरीनाम सप्ताह सुरू होता. या सप्ताहानिमित्त भजनाच्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ भैरवनाथ मंदिरात बसली होती. भजन संपताच गावकरी घरी जात असताना लिमण आपल्या काही सहकार्‍यासोंबत मंदिराजवळ बसले होते. याचवेळी चार ते पाच जण बलेनो गाडीतून घटनास्थळी आले. त्यांनी काही कळायच्या आतच हल्ला चढवला. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून तणावपूर्ण शांतता आहे.