ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
शिरगाव । सांगवडे येथे मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास गावातील काही तरुणांना बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पानमंद वस्ती येथे अमोल राक्षे, गणेश राक्षे, शुभम वाघोले, अमर सोरटे, सोमनाथ राक्षे शेताकडून गावाकडे येत होते. त्यावेळी त्यांना गाडीच्या उजेडात बिबट्या रस्त्यावर बसलेला दिसला. परंतु गाडीच्या आवाजाने तो बाजूला असलेल्या उसाच्या शेतात पळाला.
पंधरा दिवसांपासून वावर
सकाळी वडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांना संपर्क केला असता त्यांनी तत्काळ सांगवडे येथे जावून त्याच्या ठसे घेतले आणि पुढील तपासणी साठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले. ते म्हणाले, पाहिलेल्या युवकांनी रात्री गाडीतूनच त्याचे फोटोही घेतले आहेत. त्यावरून तो बिबट्याचा आहे असे दिसते. ठशावरून तर तो बिबट्याच आहे. कारण गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कासारसाई येथे बिबट्याचा वावर होता आणि अनेक शेतकर्यांना तो दिसला होता. बिबट्या हा आजूबाजूच्या 10 ते 15 किलो मिटर पर्यंत फिरत असतो यावरून तो बिबट्याच आहे. शिवाय या परिसरात उस शेती जास्त असल्याने या भागात त्याला लपून बसण्यासाठी चांगले क्षेत्र आहे. त्यामुळे तो बिबट्याच असावा.
पिंजर्यासाठी परवानगी
या भागात पिंजरा लावण्यासाठी प्रधान वनपरिक्षेत्र अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याने तसी परवानगी आम्ही मागितली आहे. आदेश मिळताच आम्ही कार्यवाही करू. ग्रामस्थांना संध्याकाळी एकटे बाहेर न पडण्याचे आवाहन आम्ही वनभाकडून केले आहे. शिवाय बिबट्या दिसल्यास काय खबरदारी घ्यावी याचेही मार्गदर्शन केले आहे.काही शेतकर्यांमध्ये चर्चा आहे कि मनमंद नामक शेतकर्याचे कुत्रे याच बिबट्याने खाल्ले असावे तेही रात्री पासून गायब आहे आणि याच भागात त्याचे दर्शन झाले होते.