सांगवी : नवरात्रौत्सवानिमित शहरातील विविध ठिकाणच्या देवीच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी लोटत आहे. जुनी सांगवी परिसरात असलेल्या शिंदेनगरातील तुळजाभवानी देवीचे मंदिर म्हणजे, एक जागृत देवस्थान. सांगवीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘आईसाहेब’ तुळजाभवानी देवी मातेच्या दर्शनासाठी सध्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नवरात्रौत्सवानिमित्त या मंदिरात देवीचा जागर सुरू असून, विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.
मंदिराला जुना इतिहास
जुनी सांगवीतील हिरकणी हौसिंग सोसायटीमध्ये तुळजाभवानी मातेचे छोटेखानी मात्र, आकर्षक असे जुने मंदिर आहे. नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या मंदिराची रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. परिसरात देवीचे हे एकमेव मंदिर असल्याने या ठिकाणी नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. या मंदिराला जुना इतिहास आहे. 1993 च्या सुमारास पीसीएमटीचे माजी सभापती कै. रंगनाथ शितोळे व त्यांच्या सहकार्यांनी सोसायटीच्या जागेत देवीचे मंदिर बांधले. पंढरपूर येथून तुळजाभवानी देवीची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठापणा करणात आली.
नवसाला पावणारी माता
गेल्या काही वर्षांपासून येथील जय तुळजाभवानी मित्र मंडळातर्फे नवरात्रौत्सवात तसेच वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या ठिकाणी नित्य पूजा-अर्चा केली जाते. नवरात्र उत्सवादरम्यान तसेच प्रत्येक शुक्रवारी व मंगळवारी देवीच्या दर्शनासाठी महिला भाविकांची मोठी गर्दी होत असते. नवसाला पावणारी देवी म्हणून सांगवीतील तुळजाभवानी देवीची आराधना केली जाते.