सांगवीच्या संगीत महोत्सवात बासरी, सरोदवादनाने रंगत

0

नवी सांगवी : जुनी सांगवीतील बालयोगी नंदकुमार महाराज श्री दत्त आश्रमात सुरू असलेल्या संगीत महोत्सवात सहाव्या दिवशी पंडित चेतन जोशी यांच्या बासरी व पंडित गिरीश चरवड यांच्या सरोदवादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य पंडित चेतन जोशी यांचे सुरेल बासरीवादन झाले. त्यांनी राग पुरिया कल्याणने सेवेस प्रारंभ केला. त्यांनी मिश्र शिवरंजनी रागातील धून वाजवली. ‘मिर्झापूर कैली गुलजार’ हा दादरा व ‘पायोजी मैने राम रतन घन:श्याम’ हे भजन रसिकांच्या विशेष पसंतीस पडले. पंडित जोशी यांना अविनाश पाटील यांची तबल्यावर तर मनोज भांडवलकर यांची पखवाज साथ मिळाली.

स्वरानुभूती सांगितीक कार्यक्रम
दुसर्‍या सत्रात पंडित गिरीश चरवड यांचा ‘स्वरानुभूती’ हा सांगितीक कार्यक्रम झाला. त्यांनी सरोदवर राग दुर्गा सादर केला. चरवड यांच्या सरोदवादनाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अमित काकडे यांनी सादर केलेल्या तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, माझे माहेर पंढरी या अभंगांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. रवी फडके यांनी लहानपण देगा देवा, गुरु परमात्मा परेशू, धन्य भाग सेवा आदी गायनास चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना उदय रामदास यांची तबला तर मनोज भांडवलकर यांची पखवाज साथ मिळाली.